वाढत्या वजनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहाराचे नियोजन असणे गरजेचे आहे. याचबरोबर डायटमध्ये काही पेयांचा समावेश केलात तर तुम्हाला वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. वजन कमी करण्यासोबतच पोटाच्या समस्या, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेहावरही नियंत्रण ठेवता येते. कोणती पेये घ्यायची चला जाणून घेऊया.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी प्या. यामुळे वजन झपाट्याने कमी होते. १ ग्लास कोमट पाण्यात १ लिंबू टाकून प्या. त्यात थोडे मध ही घालू शकता.

आठवड्यातून एकदा हळदीचे पाणीही प्यावे. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे शरीराला निरोगी बनवतात. यामुळे वजनही कमी होते.

रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. मेथीचे पाणी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्या.

बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय निरोगी राहते. बडीशेपचे पाणी गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही दूर करते. १ चमचा बडीशेप रात्री १ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून घ्या. आता ते पाणी कोमट करून प्या.

रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास लठ्ठपणा काही दिवसातच कमी होतो. यासाठी १ ग्लास पाण्यात १ चमचे जिरे घालून रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून प्यावे.

ओव्याचे पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पोटाच्या समस्या दूर होतात. यासाठी १ चमचा ओवा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. हे पाणी सकाळी गाळून प्या.









