वजन वाढले की अनेक व्याधी सुरु होतात. औषधपचार करुनही बऱ्याचदा याचा फायदा होतोच असे नाही. त्यामुळे अनेकजण खूप त्रस्त असतात. यावर उपाय म्हणून मग शरीरावर अन्याय केला जातो, जिम, डाईट, आयुर्वेदाचा आधार घेतला जातो. काही-काहीजण तरी शरारातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ऑपरेशनचा पर्याय निवडतात. मात्र असे उपाय किंवा उपचार सर्वांनाच सुट होईलचं असे नाही. अशावेळी शरीरावर औषधांचा मारा करण्यापेक्षा घरगुती उपचार पध्दतीचा अवलंब करा. ज्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. चला तर जाणून घेऊया आपल्या किचनमधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा फायदा तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास होईल.

आपण आजारी असल्यावर किंवा पावसाळ्यात गरम पाणी पितो. यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो. तसेच गरम पाण्याचा फायदा लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील होतो. दिवसभरात तुम्ही जेव्हा-जेव्हा पाणी प्याल तेव्हा कोमट पाणी प्या. कोमट पाणी पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारते.

आपण लहानपणापासून एक म्हण एेकत आलो आहोत. दिवसा राजासारखे आणि रात्री भिकाऱ्यासारखे जेवावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. . परिणामी वजन वाढत नाही. रात्री जेवणात साखर, मिठाई असे पदार्थ टाळा. जेवणाची एक वेळ ठरवा. शक्यतो ७ च्या आधी जेवण करा.

त्रिफळा चूर्ण पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी आहे. याचे नियमित सेवन करा. त्रिफळा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि पचनसंस्था मजबूत करतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून रोज प्या.

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास कोमट पाण्यात टाकून रिकाम्या पोटी प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मध घालू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत करण्यासाठीही ही उपयुक्त आहे.

लढ्ढपणा कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचाही खूप फायदा होतो. यासाठी जिरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.









