जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, बंदी उठवली : शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा
बेळगाव : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या जनावरांचा आठवडी बाजार भरविण्यासाठी अखेर परवानगी देण्यात आली आहे. जनावरांच्या बाजारावरील बंदी उठवल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि दलालांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांच्या आठवडी बाजारावर निर्बंध घालण्यात आले होते. मागील दोन महिन्यांपासून जनावरांचे बाजार प्रदर्शन आणि जनावरांची वाहतूक बंद होती. त्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान मागील आठवड्यात ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून जनावरांचा आठवडी बाजार सुरू करावे, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने अखेर जनावरांच्या आठवडी बाजारावरील बंदी उठविली आहे. जिल्ह्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले होते. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होता. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व जनावरांच्या बाजारावर निर्बंध घालण्यात आले होते. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाजार सुरळीत सुरू करण्याला परवानगी दिली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील 25 हजारहून अधिक जनावरांचा लम्पीने बळी गेला होता. यंदादेखील लम्पीचा शिरकाव होताच जनावरांच्या आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा रोगाची तीव्रता यंदा कमी होती. त्यामुळे मरतुकीचे प्रमाण देखील कमी आहे. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अखेर जनावरांच्या आठवडी बाजारावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे येत्या शनिवारपासून एपीएमसी येथील जनावरांचा आठवडी बाजार पुन्हा गजबजणार आहे.
उलाढालीवर झाला होता परिणाम
रब्बी हंगामातील शेती कामासाठी शेतकऱ्यांना बैलजोडीची गरज भासू लागली आहे. दरम्यान आठवडी बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय दुभत्या गायी, म्हशी खरेदीसाठी सोयीस्कर होणार आहे. जनावरांच्या आठवडी बाजार भरला नसल्याने मागील दोन महिन्यात नवीन जनावरांच्या खरेदी-विक्रीपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दूर राहावे लागले होते. शिवाय उलाढालीवर देखील परिणाम झाला होता. मात्र आता शनिवारपासून पुन्हा बाजार भरणार असल्याने उलाढाल पूर्वपदावर येणार आहे.









