अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला ब्रह्मांड निर्मितीबाबत सांगत आहेत. ते म्हणाले, ब्रह्मांड हे माझे उत्तम निवासस्थान आहे. माझ्या लीलेने मी पंचमहाभूतांनी तयार केलेला देह धारण केला. माझ्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असे नाभिकमल उत्पन्न झाले आणि त्यात उत्तमोत्तम असा ‘आत्मभू’ नामक ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करण्याकरिता मुख्यतः रजोगुणाच्या प्रभावाने स्वतःच जन्मास आला.
विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची त्याने निर्मिती केली. देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान त्याने ठरविले. या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले. या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळय़ा गती प्राप्त होतात. पुढच्या श्लोकाच्या अर्थामध्ये पाताळ लोक हा चौथा सांगितलेला आहे व त्याचे मृत्युलोकाशी ऐक्मय आहे. याचेही यथातथ्य निरुपण तू आता समजून घे. इंद्रादि सर्व देवांना राहण्यासाठी स्वर्ग हेच स्थान आहे.
यक्ष, राक्षस, भूते आणि गंधर्व यांना रहावयाला आकाश आहे आणि ज्याने मोक्षास जाता येते, जेथून परलोकास जाता येते, ती कर्मभूमी म्हणजे अतळादि सप्त पाताळांसह पृथ्वी होय. थोर भाग्याने मनुष्यास त्यात रहावयास मिळाले आहे. जे सिद्ध असतात ते स्वतः त्रैलोक्मयाच्या वर रहातात. ते सिद्धांचे नेहमी राहाण्याचे सिद्धिस्थान होय. अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, महातळ, तळातळ आणि पाताळ ही पृथ्वीच्या खाली असणाऱया सर्व पाताळांची नावे आहेत.
आता सप्तपाताळात अधिकारी कोण आहेत ते ऐक. तर अतळामध्ये मयासुराचा पुत्र बळ राहतो. तो पराक्रमाने अत्यंत प्रबळ आहे. त्याच्याजवळ राक्षसांचा मोठा समुदाय आहे. वितळामध्ये हाटकेश्वर आहे. जो उमाकांत व कापुरासारखा गौरवर्ण आहे. तेथे सुवर्णाच्या राशी जिच्या प्रवाहातून वाहतात अशा हाटकनदीचा प्रवाह वहात आहे. सुतळामध्ये ज्याचा द्वारपाल विष्णू आहे असा महान् भगवद्भक्त बळीराजा आहे. प्रल्हादही त्याच्याजवळ विष्णुभक्तांसह रहात असतो. शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर रसातळामध्ये मयासुराची स्थापना केली. तो मायालाघवी व महान पराक्रमी वीर सहपरिवार तेथेच रहात असतो. जे विष धारण करणारे व कोपिष्ट असे कद्रुचे मुलगे सर्प, ते सर्व महातळामध्ये वस्ती करून असतात. तळातळामध्ये दानव राहतात, त्यांना ‘निवातकवची वीर’ असे म्हणतात. तेथील राजा नाग असून तो त्यास पूज्य आहे, त्या ठिकाणची रचना मोठी अपूर्व
आहे.
सातव्या पाताळात नाग राहतात. तेथे एक लाख नागांचा समुदाय ज्याच्या सेवेला तत्पर आहे, असे वासुकी वगैरे अनेक थोर थोर नाग पद्मिनींबरोबर विलास करीत असतात. स्वर्गामध्ये रंभा, उर्वशी या जशा सुंदर स्त्रिया आहेत, त्याप्रमाणेच पाताळात पद्मिनी नामक स्त्रिया आहेत. त्यांच्या सौंदर्याची थोरवी परलोकांमध्येही वर्णन होत असते. त्याच्या खाली तीनशे योजनांवर सहस्रमुखांचा शेष राहतो. त्याच्याच अंगावर मी भगवान् निद्रा करतो. त्याच्याही पुष्कळ खाली अंधतामिस्रादि मोठमोठाले नरक आहेत. त्याच्याही खाली कर्म असून त्याच्या खाली आवरणोदक आहे.
ज्यांचा स्वर्गातील भोग क्षयास जातो आणि अधोभागातील भोग भोगण्याइतकेच पुण्य शिल्लक राहते, त्या पुण्याच्या अनुक्रमाप्रमाणेच ते लोक सप्तपाताळात जन्मास येतात. ज्याच्या गाठीला फक्त पातकच असते, तो नाना प्रकारच्या नरकांचा उपभोग घेतो. अशी ही त्रिलोकी ब्रह्मदेवानेच स्वतः रचिली आहे. उद्धवा! निरिच्छता व विरक्ती यांना एव्हढे महत्त्व आहे की, ज्यांच्या मनामध्ये निरिच्छता नाही, ज्यांनी स्वप्नांतही विरक्ती पाहिलेली नाही, त्यांना खात्रीने त्रैलोक्मयावर गती मिळत नाही.
क्रमशः








