आयटी, रियल इस्टेट क्षेत्रांची चमक: सेन्सेक्स 243 अंकांसह तेजीत
मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स 243 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला आहे. यामध्ये आयटी, वाहन व रियल इस्टेट या क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या चममकादार कामगिरीमुळे बाजारात तेजीची नोंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 242.83 अंकांनी वधारुन 61,275.09 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 86.00 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,015.85 वर बंद झाला आहे. बुधवारी प्रामुख्याने आयटी, वाहन आणि रियलिटी यांचे निर्देशांक हे एक एक टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यांनी बाजाराला तेजी राखण्यात सहकार्य केले. बीएसईमधील मिडकॅपचा निर्देशांक 0.7 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप 0.4 टक्क्यांनी तेजीत राहिल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यापैकी सेन्सेक्समधील टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक म्हणजे 5.79 टक्क्यांनी वधारत बंद झाले आहेत. यासह रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 2.22 टक्क्यांनी वधारत बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग वधारुन बंद झाले. टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले इंडिया, टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, टायटन आणि विप्रो यांचे समभाग तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग 1.22 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. आयटीसी, सनफार्मा, एचडीएफसी, लार्सन अॅण्ड टुब्रो व एचडीएफसी बँक यांचे समभाग 0.27 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
रुपयामध्ये काहीशी घसरण
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात बुधवारी काहीशी घसरण नेंदवत 82.80वर बंद झाला आहे.
तज्ञांच्या नजरेतून…..
अमेरिकेतील महागाईच्या दरात नरमाईचा कल राहिला असला तरी हा अंदाज जादाचा असल्याचे संकेत आहेत. आगामी काळात फेडरल बँक व्याजदर वाढवणार असून याबाबतील तज्ञांनी मत नोंदवले आहे.









