तामिळनाडूतील युवकाच्या क्रिएटिव्हिटीमुळे लोक अवाप्
विवाह हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो आणि प्रत्येक जण हा दिवस विशेष ठरवू पाहत असतात. अशीच एक क्रिएटिव्हिटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्वतःचा विवाह स्मरणीय करण्यासाठी एक विशेष युक्ती केली आहे. त्याने स्वतःच्या विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेला दिलेला लुक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्यक्तीने स्वतःच्या विवाहाची निमंत्रणपत्रिका औषधांच्या स्ट्रीपच्या मागील भागाप्रमाणे डिझाइन केली आहे. पहिल्या नजरेत प्रत्येकाला हे वेडिंग कार्ड केवळ औषधांच्या स्ट्रिपसारखीच दिसते. याकडे अधिक लक्षपूर्वक पाहिले तरच ही औषधे नसून विवाहाची निमंत्रणपत्रिका असल्याचे लक्षात येते.

औषधांच्या स्ट्रिपप्रमाणे दिसणाऱया विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत व्यक्तीने स्वतःची आणि नियोजित वधूचे नाव नमूद केले आहे. याचबरोबर त्याने विवाहाची तारीख, जेवणाची वेळ आणि अन्य विधींची माहिती दिली आहे. या व्यक्तीने विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेला एका टॅबलेट शीटच्या स्वरुपात तयार करवून घेतले आहे.
हे अनोखे वेडिंग कार्ड सध्या वेगाने सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कार्डच्या वरच्या बाजूस एजिलारासन वेड्स वसंतकुमारी असे लिहिण्यात आले आहे. तर निमंत्रण पत्रिकेत विवाहाची तारीख 5 सप्टेंबर नमूद आहे. याचबरोबर या इसमाने सर्व मित्र आणि नातेवाईकांना विवाह सोहळय़ात उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
या वेडिंग कार्डवर लोक वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बहुतांश लोकांनी या क्रिएटिव्हिटीसाठी व्यक्तीची प्रशंसा केली आहे. कुणी याला औषध समजून खाऊ नये, हे औषध नसून वेडिंग कार्ड आहे असे एका युजरने म्हटले आहे. वेडिंग कार्डनुसार हा विवाह सोहळा तामिळनाडूत होणार आहे. तर हे कार्ड तयार करवून घेणारा व्यक्ती फार्मसीशी निगडित असल्याचे समजते. स्वतःच्या प्रोफेशनद्वारेच त्याला अशाप्रकारचे कार्ड तयार करवून घेण्याची कल्पना सुचली आहे.









