रत्नागिरी :
भारतीय हवामान शास्त्र विभाग रत्नागिरीतील नाचणे येथे कार्यरत हवामान केंद्राला कोणीच वाली नसल्याचे समोर आले आहे. सध्या वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पण सोमवारी दुपारी १ वाजता हवामान केंद्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकून येथील सर्वच कर्मचारी गायब होत असल्यामुळे हवामान विभाग रामभरोसे झाला आहे.
राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कोकणासह रत्नागिरीत कोणत्याही वेळी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. असे असताना नाचणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाला दुपारी कुलूप लावण्यात येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. लाखो रुपये खर्च करून येथे यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांसह येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही कार्यालय बंद करून कर्मचारी गायब होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्राच्या आवारातच अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत.








