गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव साजरा न झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसापासून मंडळाचे कार्यकर्ते मंडप डेकोरेशन, सजावट व मूर्ती आणण्याची जोरदार तयारी करत आहे.
करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील दिलदार तरुण मंडळाचा तरुण कार्यकर्ता भूषण पांडुरंग खोत( वय 22 ) सुद्धा आपल्या मंडळाचा गणपती आणण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून नियोजनामध्ये धडपडत होता. बुधवारी रात्री भूषण आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर गणपती आणण्यासाठी गेला. बाहेरगावातून गणपती घेऊन येत असताना गावच्या वेशीवरच भूषणला हृदयविकाराचा अचानक जोराचा झटका आला. बेशुद्ध झालेल्या भुषणला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवले. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापुर्वीच भुषण हे जग सोडून गेला होता. या घटनेने मंडळातील कार्यकर्त्यांच्या बरोबरच संपूर्ण गावाला धक्काच बसला. गेल्या आठ दिवसापासून सातत्याने मंडळाचा गणपती आणि सजावट आणि मिरवणूक आणण्यासाठी धडपड करणारा आपला भूषण आपल्यातून असा अचानक जाणे हे कोणालाही या ठिकाणी न पटण्यासारखे होते. त्याच्या जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोक कळा पसरली. गावात संपूर्ण वाजणारे डीजे, लाऊड स्पीकर पूर्णतः बंद झाले. गावात एकच शांतता पसरली आणि प्रत्येकाला दुःख झाले.भूषण उंचगाव येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीज मध्ये काम करत होता. त्याच्यामागे त्याचा लहान भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.