रत्नागिरी :
अजित यशंवतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले असतील तर ते माझेच चेले आहेत. महायुतीच्या बैठकीत ते भेटतील तेव्हा त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असा चिमटा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढला. महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. युतीतील अन्य पक्षांनीही याच पद्धतीने पक्षप्रवेश करून घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीत कडव्या शब्दात खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना सन्मानाने पक्षात प्रवेश देताना आम्हाला विचारले होते का? असा प्रती सवाल तटकरेंनी केला.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील लांजा येथील अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार तटकरे म्हणाले, युतीमध्ये सर्व पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचे काम करत आहोत. पक्षप्रवेश करताना आम्ही कोणाला का विचारायचे? युतीतील इतर पक्षांनी जिह्यात पक्ष प्रवेश करून घेताना आम्हाला कुठे विचारले होते? विधानसभा निवडणुकीत समोर लढताना ज्यांनी खालच्या पातळीवर जावून टीका केली होती. त्यांनाच सन्मानाने पक्षात घेतले गेले. त्यावर आम्ही काय बोललोय का? असा सवाल तटकरेंनी केला.
- वाद मिटवण्यासाठी समन्वय समिती आहे!
महायुतीतील अंतर्गत वाद सोडविण्यासाठी समन्वय समिती आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. ते प्रत्येक गोष्टींवर अंतिम निर्णय घेत असतात. समन्वय समितीमध्ये माझ्यासह मंत्री उदय सामंत यांचाही समावेश आहे. बैठकीवेळी आपण सामंतांशी बोलू आणि त्यांची शंका दूर करू, असे तटकरे म्हणाले. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले, महायुतीतील पक्षाचे प्रमुख नेतेच याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.








