भारतीय किसान संघाच्या गोवा प्रांत पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन
पणजी : राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेऊन त्याचे व्याज नियमित फेडले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी भरलेली व्याजाची रक्कम परत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. भारतीय किसान संघाच्या गोवा प्रांत पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. किसान संघाचे गोवा प्रांताध्यक्ष संजीव कुंकळ्येकर, उपाध्यक्ष कृष्णनाथ सावंत देसाई, महामंत्री श्रीरंग जांभळे, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील व युवा शेतकरी वरद सामंत उपस्थित होते. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. फक्त ज्या शेतकऱ्यांनी कर्जावरील व्याज नियमित भरलेले आहे त्यांनाच ते व्याज परत करण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतीचा बचाव कसा करता येईल यावर उपाय शोधण्याची शेतकऱ्यांची मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली, असे भारतीय किसान संघाचे स्थानिक अध्यक्ष संजीव कुंकळयेकर यांनी सांगितले. खरे तर या संबंधी अधिसूचना यापूर्वीच जारी झाली होती. पण तिची अंमलबजावणी होत नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. कुठलीही राष्ट्रीयकृत बँक हा मोबदला शेतकऱ्यांना घेऊ देत नाही, त्यामुळे या बँकांना कडक आदेश जारी करण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली असल्याचे कुंकळ्येकर म्हणाले. गोवा डेअरीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. संजीवनी साखर कारखान्यासारखी परिस्थिती येऊ नये यासाठी सरकारने आताच योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.









