हल्लेखोरांना रासुका, प्रसंगी तडीपारी : रामा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पणजी : रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेले काणकोणकर यांच्यावर बांबोळी येथे गोमेकॉत उपचार सुरु आहेत. काल शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. काणकोणकर यांना गोमेकॉत उपचार घेताना तसेच त्यांच्या निवासस्थानी पोलिस सुरक्षा देण्यात येईल, तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या भेटीत दिले. गोमेकॉच्या बाहेर येताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, या हल्ला प्रकरणातील पाच संशयितांना हल्ल्यानंतर त्वरित अटक केली असून एकटा बाकी आहे. त्यालाही लवकरात लवकर अटक केली जाईल. हल्लेखोरांवर ‘रासुका’ (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याचा आणि प्रसंगी त्यांना तडीपार करण्याचाही विचार सुऊ आहे. गोव्यात गँगवार समूळ निर्मूलन करण्यासाठी पोलिसांना मोकळीक देण्यात आली आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड कोण? याचाही उलघडा लवकरच होणार आहे, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









