गोवा फॉरवर्डचा सरकारला इशारा
पणजी : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर कीड लागलेला व अळ्या असलेला तांदूळ वितरित करण्यात येत असल्याने गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी नागरी पुरवठा खात्याच्या अधीक्षक मळगावकर यांना निवेदन दिले आणि सात दिवसांच्या आत स्वस्त धान्य दुकानांमधून चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळाला नाही तर 500 कार्यकर्त्यांसह नागरी पुरवठा खात्यावर मोर्चा आणू असा इशारा दिला आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून खराब तांदळांचा पुरवठा करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांना घेराव घालण्यासाठी गेलेल्या गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांना संचालक भेटले नाही तेव्हा त्यांनी अधीक्षकांना निवेदन दिले. गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, प्रशांत नाईक, विकास भगत, रेणुका सिल्वा, डॉ. लॉरेन, फ्रेडी तावासो, दीपक कळंगुटकर, संतोष सावंत, श्रीकृष्ण हळदणकर व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. काणकोणपासून पेडणेपर्यंतच्या सर्व स्वस्त धान्य दुकानांवर कीड लागलेल्या खराब तांदळांचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य लोक अस्वस्थ बनले आहेत. प्रत्येक ठिकाणी नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांना घेराव घालून जाब विचारला जात आहे. याबाबत गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी काल मंगळवारी नागरी पुरवठा खात्यातील संचालकांना भेटून जाब विचरण्याचा प्रयत्न केला असता संचालक सुट्टीवर असल्याचे आढळून आले. संचालक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून सुट्टीवर जातात, असा आरोप गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कार्यकर्ते अडकले लिफ्टमध्ये
गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात गेले असता संचालक सुट्टीवर असल्याचे त्यांना कळले तेव्हा ते नागरी पुरवठा खात्याचा अतिरिक्त ताबा असलेल्या उपासना माजगांकर यांच्याकडे जात होते. जुन्ता हाऊस इमारतीच्या तिसऱ्या लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट मध्येच बंद पडली. त्यामुळे हे कार्यकर्ते सुमारे 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते.









