पुणे / प्रतिनिधी :
निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावले ते जाणार आहोत. आमचीच बाजू कशी उजवी, हे आम्ही सांगणार असल्याचे अजित पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. पवार म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शुक्रवारी आणि शनिवारी मंत्रिमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. मीही संभाजीनगरमध्ये जात आहे. त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात या वेळी ऊहापोह होईल. मराठवाडय़ात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत. राज्यातही काही भागात अशी स्थिती आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथे स्थिती चांगली आहे. हवामान विभागाने आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या सर्वाचा आढावा घेतला जाईल.
कंत्राटी भरतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यात वेगवेगळय़ा विभागात 1 लाख 50 हजार मुला-मुलींची भरती सुरू आहे. पण विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असतात. काही झाले, की आमच्या विरोधकांना उकळय़ा फुटतात आणि ते काहीपण चुकीच्या बातम्या पसरवतात.








