प्रहार शक्ती पक्षातर्फे गोव्यातील दिव्यांग संघटनांशी चर्चा
पणजी : दिव्यांग बांधव हे देशाचे प्रमुख अंग आहे. त्यांना सुरक्षा मिळण्याबरोबरच मान-सन्मान प्राप्त करून देणे हे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. या भावनेतूनच दिव्यांगांसाठी आपले जोरदार कार्य सुरू आहे. दिव्यांगांचे केंद्रीय पातळीवर संघटन करण्याच्या उद्देशाने प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आपण गोव्यात आलो आहे. गोव्यातील दिव्यांग संघटनांशी चर्चा केली असून, देशपातळीवर दिव्यांग संघटन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रहार शक्ती पक्षाचे किशोर राव, भक्ती खडपकर, विठ्ठल खरावत, नितीन राऊत आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाविषयी पत्रकारांनी बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारण हे न समजण्यापलिकडे गेलेले आहे. अशा राजकारणामुळे आता जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडत चालला आहे. निवडणूक आणि मतदार प्रमुख दुवा आहे. परंतु आता लोक महाराष्ट्राच्या राजकारणामुळे संभ्रमित झाले असून, त्यांचा नेत्यांवरील विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवे. अन्यथा भारतीय घटनेमुळे आम्हाला मिळालेला एका मताचा अधिकार याला काडीचीही किंमत राहणार नाही. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तरीही महाराष्ट्रातील पक्षाचे नेते पक्षात टिकून न राहता सोयीच्या राजकारणाला बळी पडत आहे. परंतु अशाने भविष्यात जनता आणि नेते यांच्यात दरी निर्माण होणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
विरोधकांच्या एकत्रीकरणावर प्रश्नचिन्ह
2024मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. जनता कुणाच्या बाजूने राहील याचा अंदाज बांधणेही मुश्किल होणार आहे. कारण राज्या-राज्यात फोडाफोडीचे आणि फुटाफुटीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे विरोधकांचे एकत्रीकरण कसे होईल ते पहावे लागणार आहे. विरोधकांच्या एकत्रिकरणावरच केंद्रातील सत्ता अवलंबून आहे. केंद्रातील सत्ता बदलल्यास महाराष्ट्रासह इतर राज्यातही लोकसभा निवडणुकीनंतर मोठे बदल दिसून येतील, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.









