पाश्चिमात्य देशांना भारताकडून चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ लंडन
रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत असून याला अनेक पाश्चिमात्य देश विरोध करत आहेत. तर आता ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी पाश्चिमात्य देशांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करू शकत नसल्याचे दोराईस्वामी यांनी सुनावले आहे. युरोपचे अनेक देश स्वत: रशियाकडून दुर्लभ खनिजांसमवेत अनेक ऊर्जा उत्पादने खरेदी करत आहेत. हेच देश भारताला रशियासोबत व्यापार न करण्याचा सल्ला देत आहेत असे म्हणत दोराईस्वामी यांनी युरोपीय देशांचा दुटप्पीपणा दाखवून दिला आहे.
भारताने मागील काही काळात रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध झाल्यापासून रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. अशास्थितीत रशियाकडून अत्यंत कमी दरात भारताला कच्चे तेल पुरविले जात आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दशकांपेक्षा जुने आहेत. पाश्चिमात्य देश जेव्हा आम्हाला शस्त्रास्त्रs पुरविण्यास तयार नव्हते आणि आमच्या शेजारी देशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs पुरवित होते. तेव्हा रशियाने भारताला साथ दिली होती असे दोराईस्वामी यांनी म्हटले आहे.









