मुतगा ग्रामस्थांनी मांडले म्हणण
बेळगाव : रिंगरोडमध्ये मुतगा गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठिकाणी सुनावणी झाली. त्यावेळी मुतगा ग्रामस्थांनी आम्ही कदापिही जमीन देणार नाही, असे भूसंपादन अधिकाऱ्यांना सांगितले. मुतगा गावातील 40 हून अधिक शेतकऱ्यांना नोटिसी आल्या होत्या. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले आहे. सदर जमीन ही अत्यंत सुपीक आहे. यापूर्वी विविध प्रकल्पांसाठी गावातील जमिनी काढून घेण्यात आल्या आहेत. सध्या थोडीच जमीन शिल्लक आहे. त्यावर आमची गुजराण सुरू आहे. जनावरेदेखील असून त्यांना चारादेखील मिळणे अवघड होणार आहे. तेव्हा रिंगरोड तुम्ही रद्द करा, आम्ही त्या रस्त्यासाठी जमीन देऊ शकणार नाही, असे यावेळी सांगितले. या परिसरातील काही शेतकऱ्यांना अजूनही नोटिसा देण्यात आल्या नाहीत. त्या शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत, असेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जवळपास 31 गावातील शेतकऱ्यांनी सुनावणीला उपस्थित राहून आम्ही जमीन देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीदेखील काही ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. झाडशहापूर गावच्या शेतकऱ्यांची सुनावणी होणे बाकी असून ही सुनावणीही लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुतगा गावच्या शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. शाम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर यांनी काम पाहिले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









