रत्नागिरी :
रिलायन्स प्रकल्पासाठी आमच्याच जागा का? भविष्यात या परिसरात समुद्री महामार्ग जाणार आहे. तेव्हा परिसरात पर्यटनाला मोठा वाव असताना या गावांमध्ये प्रकल्पाची जबरदस्ती का? आमच्या जमिनींना करोडोंची किंमत मिळत असताना आता आम्ही कवडीमोलाने एमआयडीसीला का द्याव्यात? असे प्रश्न सोमवारी वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनासंदर्भात आयोजित सुनावणीदरम्यान ग्रामस्थांकडून विचारण्यात आले. यावेळी 154 अर्जदार ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.
रत्नागिरी तालुक्यातील वाटद एमआयडीसीसंदर्भात हरकतींवर सोमवारी कळझोंडी गावातील ग्र्रामस्थांची सुनावणी प्रक्रिया येथील अल्पबचत कार्यालयात पार पडली. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुनावणीसाठी जिजाऊ प्रतिष्ठानकडून करण्यात आलेल्या 165 अर्जांपैकी 154 अर्जदार ग्रामस्थ उपस्थित होते. शेती व फळबागायती हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि भविष्यात या व्यवसायासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर विकसित होत आहे. असे असताना आता कवडीमोलाने आम्ही आमच्या जमिनी का द्यायच्या तसेच आमच्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळाले नाही तर आम्ही आमची गुरं-ढोर घेवून जिल्हा प्रशासनाच्या दारात ठिय्या आंदोलन कऊ, असा इशाराही यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून देण्यात आला.
रत्नागिरी आणि उंडी-रिळ परिसरात सेमी कंडक्टरचा प्रकल्प तर वाटद पंचक्रोशीत बंदुका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी वाटद, कोळीसरे, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ परिसरातील जागेचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेची एकत्रित मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
प्रकल्पामध्ये गावातील कोणतेही घर, धार्मिक ठिकाण, पाण्याचे स्त्रोत, कलम बागा, गावातले रस्ते, पायवाटा बाधित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच परिसरात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होवू नये. गावातील ग्रामस्थांना रोजगार मिळावा, यासाठी परिसरात आवश्यक असे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावे. जेणेकरून प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञान ग्रामस्थांना अवगत करता येईल. तसेच जमिनीला योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
- जमिनीला योग्य मोबदला देणार : देसाई
ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून यावेळी औद्यागिक विकास महामंडळाकडून परिसरात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प होणार नाही, याबाबत लेखी म्हणणे सादर केले. तसेच 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार जमिनीला योग्य मोबदला देण्यात येईल, असेही प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. जागा वगळताना प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमेवरील जागा वगळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी ग्रामस्थांना सांगण्यात आले. यावेळी औद्यागिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारी वंदना करमाळे उपस्थित होत्या.
- वाटद ग्रामस्थांची आज, गडनरळची 10 रोजी सुनावणी
वाटद गावची सुनावणी 8 जुलैला असून 103 ग्रामस्थांनी वैयक्तीक अर्ज केले असून सुनावणी सकाळी 11 वाजता होणार आहे. वाटदसंदर्भात जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर बुधवारी 9 जुलैला सुनावणी होणार आहे. या अर्जावर 281 ग्रामस्थांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. गडनरळ येथील 12 अर्जावर 10 जुलैला सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असून यात 60 खातेदार आहेत तर जिजाऊ संघटनेने केलेल्या अर्जावर सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. यावर 73 ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या सर्व अर्जदारांच्या अर्जावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे कलम 32 (3) अन्वये सुनावणी होणार आहे.








