गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त
वृत्तसंस्था/ चेन्नई
हिंदी भाषेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व राज्यांनी हिंदीचा स्वीकार करावा असे शाह यांनी 4 ऑगस्ट रोजीच्या बैठकीत म्हटले होते. स्टॅलिन यांनी यावर आक्षेप दर्शविणारा ट्विट केला आहे. अमित शाह हे बिगरहिंदी राज्यांवर हिंदी लादू पाहत आहेत. तामिळनाडू हा प्रकार कदापिही सहन करणार नाही, आम्ही हिंदीचे गुलाम होणार नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
4 ऑगस्ट रोजी शाह यांनी संसदीय राजभाषा समितीच्या 38 व्या बैठकीचे अध्यक्षत्व केले होते. सर्वांनी कुठल्याही विरोधाशिवाय हिंदी भाषेचा स्वीकार करावा. हिंदी भाषा उर्वरित भाषांशी स्पर्धा करत नसून सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन दिल्यानेच देश बळकट होणार असल्याचे शाह यांनी म्हटले होते.
बिगरहिंदी भाषिकांना स्वत:च्या अधीन करण्याचा हा प्रयत्न आहे. तामिळनाडू कुठल्याही प्रकारच्या हिंदी अधिपत्याला स्वीकारणार नाही. आमची भाषा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून आम्ही हिंदीचे गुलाम होणार नाही. कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांनीही हिंदी लादण्यास विरोध दर्शविला आहे. शाह यांनी वाढत्या विरोधाकडे लक्ष द्यावे. 1965 च्या हिंदीविरोधी आंदोलनाला पुन्हा जागे करणे मूर्खपणाचे पाऊल ठरेल असे इशारावजा विधान स्टॅलिन यांनी केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा स्टॅलिन यांच्यावर निशाणा
एम.के. स्टॅलिन यांना हिंदी तसेच इंग्रजी भाषाही योग्यप्रकारे येत नाही. याचमुळे अमित शाह यांना नेमके काय म्हणायचे होते हेच त्यांना समजू शकलेले नाही. शाह यांनी सर्व राज्यांमध्ये मातृभाषांमध्ये शिक्षण दिले जावे असे स्पष्ट केले असल्याचे तामिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी नमूद केले आहे.
देशातील हिंदी भाषिकांचे प्रमाण
हिंदी हे देशात सर्वात व्यापक स्वरुपात बोलली जाणारी भाषा आहे. 52.8 कोटी लोक म्हणजेच देशातील 43.6 टक्के लोकसंख्येही ही मातृभाषा आहे. भौगोलिकदृष्ट्या हिंदीभाषिक देशाच्या निम्म्याहून अधिक क्षेत्राला व्यापतात. सुमारे 13.9 कोटी लोकांनी (11 टक्क्यांहून अधिक) हिंदीला दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरविले आहे.









