संसदेच्या 96 वर्षे जुन्या वास्तूतील कामकाजाचा मंगळवार हा अखेरचा दिवस होता. स्वातंत्र्य आणि राज्यघटना स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार राहिलेल्या या वास्तूला निरोप देण्यासाठी सर्वच पक्षांचे खासदार उपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांसोबत छायाचित्रे काढून घेतली आहेत. यानंतर सर्व खासदार सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले. सेंट्रल हॉलमध्ये स्वत:चे अनुभव मांडताना काही खासदार भावुक झाले, तर काही खासदारांनी याला गौरवाचा क्षण ठरविले.
संसदेचा सेंट्रल हॉल आम्हाला भावुक देखील करतो आणि कर्तव्यासाठी प्रेरित देखील करतो. येथेच 1947 मध्ये इंग्रजांच्या राजवटीने सत्ता हस्तांतरण केले. नंतर राज्यघटनेने देखील येथेच आकार घेतल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले आहेत.
आज आम्ही येथून निरोप घेत संसदेच्या नव्या भवनात प्रवेश करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिनी नव्या संसद भवनात प्रवेश करत असल्याने हा क्षण अत्यंत शुभ आहे. नव्या संसद भवनात आम्ही सर्व जण मिळून नव्या भविष्याचा श्ा़dरी गणेशा करणार आहोत असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनाला संविधान सदन या नावाने ओळखले जाण्याचा प्रस्ताव मांडला. सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित खासदारांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे. जुन्या भवनाची प्रतिष्ठा कधीच कमी होऊ दिली जाऊ नये. संविधान सदनामुळे आमची प्रेरणा कायम राहणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.









