कोल्हापूर :
महापालिकेने महापुराच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शहरातील नाले सफाई मोहीम युध्दपातळीवर हाती घेतली आहे. कसबा बावडा यल्लमा मंदिर येथील मुख्य रस्त्यावरील चॅनेलमधील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढला. त्यातून तब्बल दोन ट्रक भरुन रिकाम्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या निघाल्या. नाल्यातील पाणी अडवून ते पुरात घरापर्यंत येण्यास हा प्लास्टिकचा कचराच कारणीभूत ठरत असूनही आम्ही कोल्हापूरकर नाही सुधारणार? असेच हा बाटल्याचा ढिग पाहून म्हणावे लागेल.
शहरात पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचलेल्या प्लास्टिक बाटल्यांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे यापूर्वीच सिध्द झाले आहे. नाले तुंबल्याने पाणी नागरी वस्तीत शिरते. अनेक कॉलन्यांना महापुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील पस्तीसहून अधिक नाले एक तर बुजवले आहेत किंवा त्यांचा नैसर्गिक प्रवाह बदललेला आहे. यात आता प्लास्टिक कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे नाल्यांची अतिरिक्त पाणी वहन क्षमताच कमी झाली आहे.
पावसाळ्यात नाले तुंबतात आणि पाणी अनेक कॉलनीतील घरात येते. प्लास्टिक बाटल्या आणि कचरा हे मुख्य कारण आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र घरापर्यंत पुराचे पाणी येण्यास आपणच अप्रत्यक्ष हातभार लावत असूनही सुधारणा होताना दिसत नाही, हे कसबा बावड्यातील नाल्यातून काढलेल्या बाटल्याच्या ढिगाकडे पाहून जाणवल्याशिवाय राहत नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर नाल्यांची नियमित स्वच्छता आणि प्लास्टिकवर नियंत्रण ठेवले नाही, तर पावसाळ्यात पुराचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये पावसाळ्यापूर्वी तयारी सुरू असली, तरी मागील वर्षांप्रमाणेच नाल्यातील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण चिंताजनक आहे. 2024 मध्ये कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर नसली, तरी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यास नाल्यांमधील प्लास्टिक हे एक कारण होते.
- प्रशासनाचे प्रयत्न आणि आव्हाने
महापालिकेने नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र, नागरिकांकडून प्लास्टिकचा बेसुमार वापर आणि त्याची चुकीची विल्हेवाट ही समस्या कायम आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये प्लास्टिक बंदी लागू केली असली, तरी कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे वास्तव आहे. कोल्हापुरात नाल्यांमधील प्लास्टिक बाटल्यांमुळे पावसात पुराचे पाणी नागरी वस्तीत येण्याचे एक कारण आहे. प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी, नाल्यांची स्वच्छता आणि जनजागृतीमुळे ही समस्या कमी होऊ शकते. पावसाळ्यापूर्वी तातडीने पावले उचलली नाहीत, तरी रस्त्यावर आणि घरात कमी पाऊस होऊनही पाणी येण्याची समस्या येऊ शकते. महापालिका प्रशासन नाले सफाई करण्याचे काम करेलच, परंतु नागरिकांनीही प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे.








