मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आश्वासन
बेळगाव : हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आवाज उठविला आहे. जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारला नव्याने प्रस्ताव देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये शेतकरी व जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करून घेताना सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिएकर 3 लाख रुपये भरपाई देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध केला जात आहे. पीकहानी झाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षाला 3.60 लाख रुपये सरकारकडूनच भरपाई देण्यात आली आहे. असे असताना जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या नियोजित भरपाई प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. प्रतिएकर 4 कोटी भरपाई देण्यात यावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून स्वतंत्र प्रस्ताव देण्यात यावा, याबरोबरच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये, यापूर्वी झालेल्या बैठकींचा अहवाल व त्यामधील प्रस्तावांची माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली. 2017 मध्ये तत्कालिन नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये सरकार व महानगरपालिकेकडून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे या भरपाईसाठी नवीन प्रस्ताव देण्यात यावेत, याबाबत मंत्रिमंडळात मुद्दा मांडून शेतकऱ्यांना अधिक भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सरकार आणि महानगरपालिकेकडून भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना अधिक भरपाई व रोजगार तसेच गाळे देण्याचे आश्वासन तत्कालिन जिल्हाधिकारी व मनपा अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा लाभ करून देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. यापुढे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी पोलिसांनीही शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, अशी सूचना ग्रामीण एसीपी गिरीश यांना केली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, मागील बैठकींचा अहवाल पाहण्यात येईल. त्यांची छाननी करून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अधिकाऱ्यांनीही दिलेली आश्वासने पाळावीत, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









