आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे विरोधकांना आव्हान : कोटबागी येथे हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीचा प्रचार
वार्ताहर/हुक्केरी
आम्ही आमचे हिशेब दाखविण्यास तयार आहोत, तुम्हीही हिशेब द्यायला तयार राहा. या निवडणुकीच्या आधी किंवा त्यानंतर आम्ही कधीही सहकारी संस्थांच्या जमा-खर्चाचा हिशेब जनतेसमोर सादर करू. तुम्हीही जनतेसमोर हिशेब द्या, असे आव्हान अरभावीचे आमदार आणि बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी विरोधकांना दिले. गुरुवारी हुक्केरी तालुक्यातील कोटबागी येथे हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघांच्या निवडणूक प्रचारानिमित्त बेल्लद बागेवाडी-एलेमुनोळी जि. पी. कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सभेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आमचे विरोधक आता आमच्या सहकारी संघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहकारी संस्थांचा हिशेब मागत आहेत. आमच्या नेतृत्वाखालील घटप्रभा सहकारी साखर कारखान्याचा 30 वर्षांतील प्रत्येक रुपयाचा हिशेब देण्यास तयार आहे.
तुम्ही संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्था आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बीडीसीसी बँकेचा हिशेब जनतेसमोर सादर करावा. तुम्ही केव्हा सांगाल तेव्हा कोणत्याही क्षणी आम्ही आमच्या कारखान्यांचे हिशेब देऊ. त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. केवळ भाषण देणे पुरेसे नाही. जनतेसोबत राहताना जनतेचीच फसवणूक करू नये. त्यातही शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कोणालाही थारा मिळणार नाही, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
मागील 10 वर्षांपासून तुम्ही बीडीसीसीचे अध्यक्ष असताना हिशेब मागितला नाही. आता तुम्हाला आमची गरज नसताना हिशेब मागणे कुठला न्याय? आमच्यासोबत असताना तुम्ही असे हिशेब मागितले असते तर त्याला अर्थ राहिला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यासाठीच आम्ही येत आहे, तुम्हीही या. एकत्र हिशेब करूया. चुका कोणीही केल्या तरी जनतेने दिलेल्या शिक्षेला बांधील असले पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला सरकार आणि सहकारी क्षेत्रांचा हिशेब मागण्याचा अधिकार आहे. यावर आक्षेप घेण्याचा हक्क आम्हाला नाही. आमच्या सेवाकाळात खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब देण्यात आम्ही कधीही तयार आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने एकूण 15 मते टाकावीत. सामान्य जागेसाठी 9 मते, महिला उमेदवाराच्या जागांसाठी 2 मते, मागासवर्ग अ राखीव जागेसाठी 1 मत, मागासवर्ग ब साठी 1 मत, अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागेसाठी प्रत्येकी एक-एक मत द्यावे. आमच्या दि. अप्पण्णगौडा पाटील सहकारी पॅनेलला ही मते देऊन सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे, अशी विनंतीही आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केली.
हुक्केरी परिसरात अप्पण्णगौडा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हिरण्यकेशी साखर कारखाना व हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत संघ हे दोन महत्त्वाचे सहकारी संघ स्थापन केले. हे संघ वाचवून त्यांचा विस्तार करणे हे आपले कर्तव्य आहे. याकरिता शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आमच्या पॅनेलला संधी दिली तर आम्ही शेतकऱ्यांची सेवा करण्यास कटिबद्धतेने काम करू. सहकारी संस्था वाढविणे आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री शशिकांत नाईक, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे अध्यक्ष अज्जप्पा कल्लट्टी, संगम कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बेळगाव डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुभाष ढवळेश्वर, संचालक राजेंद्र अंकलगी, अशोक पट्टणशेट्टी, बसप्पा मरडी तसेच दि. अप्पण्णगौडा पाटील सहकारी पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.









