फाळणीचा संदर्भ : भारताने चर्चिल यांची भविष्यवाणी ठरविली खोटी
वृत्तसंस्था/ इंदोर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले. भारत अनेक भविष्यवाण्यांना चुकीचा ठरवत प्रगतिपथावर दिवसेंदिवस पुढे वाटचाल करत आहे. आम्ही पुढे जात राहू, आम्ही विभागले जाणार नाही, कधीकाळी विभागलो गेलो होतो, परंतु ते देखील आम्ही परत मिळवू असे भागवत यांनी इंदोर येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना म्हटले आहे. भारत देश म्हणून टिकणार नसल्याची भविष्यवाणी ब्रिटिश नेत्यांनी केली होती. ही भविष्यवाणी चुकीची ठरल्याचे सरसंघचालकांनी अप्रत्यक्ष स्वरुपात ब्रिटनला जाणवून दिले आहे.
कधीकाळी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटिश राजवट समाप्त झाल्यावर म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत टिकू शकणार नाही आणि त्याचे तुकडे होतील असे म्हटले होते, परंतु असे घडले नाही. भारताने चर्चिल यांना चुकीचे ठरविले असल्याचे भागवत यांनी स्वत:च्या संबोधनात म्हटले आहे.
सद्यकाळात ब्रिटनच स्वत: फाळणीच्या स्थितीत जात आहे, परंतु आम्ही विभागणार नाही. आम्ही पुढे वाटचाल करत राहू. आम्ही यापूर्वी एकदा विभागलो गेलो होतो, परंतु ते देखील आम्ही पुन्हा एकजूट करू असे भागवत यांनी नमूद केले आहे. शेजारी देशांमध्ये बिघडत्या स्थितीदरम्यान मोहन भागवत यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
वैयक्तिक स्वार्थामुळे जागतिक संघर्ष
भारत 3 हजार वर्षांपर्यंत विश्वगुरु होता, तेव्हा कुठलाच जागतिक संघर्ष किंवा तणाव झाला नाही. परंतु आता जगात संघर्ष दिसून येत असून त्यासाठी वैयक्तिक स्वार्थ जबाबदार आहे. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे काहींचे मानणे आहे. या स्वार्थामुळेच या सर्व समस्या जन्मल्या आहेत. एकीकडे जग श्रद्धा आणि विश्वासावर चालते, तर भारत कर्मासोबत तर्काने समन्वित श्रद्धेवर चालतो. भारतात श्रद्धा ज्ञान आणि प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित असल्याचे उद्गार भागवत यांनी काढले आहेत.
नर्मदा परिक्रमा श्रद्धेचा विषय
नर्मदा परिक्रमा हा श्रद्धेचा विषय आहे. आमचा देश हा श्रद्धेचा देश आहे. भारत ही अशी भूमी आहे, जेथे कर्मवीर आणि तर्कवीर दोघेही वास्तव्य करतात असेही त्यांनी म्हटले आहे.









