आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
प्रतिनिधी / नागपूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने महायुती करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिल्याचे जाहीर केले. यात वरिष्ठ हस्तक्षेप करणार नाहीत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यावर महायुतीत अस्वस्थता होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चांना पूर्णविराम देत, सर्वच ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार असल्याचे येथे स्पष्ट केले. या सर्व निवडणुकीबाबत भाजपच्या वतीने मंथन, चिंतन करण्यासाठी वर्धा येथे विदर्भातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीबाबत स्पष्ट मत मांडले. काही अडचणी जिथे असतील, तेथे महायुती तुटली तरी एकमेकांवर जाहीर टीका टिपण्णी करणे टाळा, असा सल्ला फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व जिह्यांना जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समित्यांचे गण तसेच प्रभागाची नव्याने रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे गट जाहीरसुद्धा झाले आहेत. महापालिकांना प्रभाग रचनेकरिता एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आहे. पेंद्रातही आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांही आपण एकत्रच लढणार आहोत. काही ठिकाणी अपवाद किंवा अडचण असेल तेथेच फक्त मैत्रीपूर्ण लढती होतील. असे असले तरी महायुतीचा उमेदवार विरोधात असला तरी एकमेकांवर टीका किंवा आरोप करणे टाळा, आपण विधानसभेत एकत्र आहोत, हे ध्यानात असू द्या असे ते म्हणाले.
निवडणुका जवळ येऊ लागल्याने विरोधक आता वेगवेगळे नरेटिव्ह निर्माण करणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच अधिकार नाही. त्यांचा प्रचाराचा सर्व भर खोट्या नरेटिव्हवरच राहणार आहे. मराठी-हिंदी भाषेचा वाद हासुद्धा नरेटिव्हचा एक भाग आहे. आपण मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तिसरी भाषा म्हणून कुठलीही भाषा निवडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यात हिंदीची सक्ती केली नाही. फक्त तिसरी भाषा कुठली निवडायची एवढाच मुद्दा आहे. मात्र या वादाला मराठी विऊद्ध हिंदी असा रंग देण्यात आला. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. ‘ये पब्लिक है, सब जाणती है’ असे त्यांनी सांगितले. आपण आपली कामे घेऊन मतरादारांकडे जा, आपले व्हीजन त्यांना सांगा. मतदार आपल्याला निवडून देण्यास तयार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष होता. आता आपलाच विक्रम आपल्याला तोडायचा आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
मुंबईत महायुतीचा महापौर
दरम्यान रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे, यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण कोणासोबत युती करत आहे, हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचे आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, ते वेगळे लढले किंवा एकत्रित लढले, कसेही होऊ द्या तरीही महापौर महायुतीचाच होणार, असे यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.
शहानिशानंतर बहिणींचे ते अकाउंट बंद
पुऊषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सुमारे 14 हजार अशा प्रकारचे अर्ज समोर आले आहेत. याबाबत देखील फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की 26 लाख असे अकाउंट सापडले आहे जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत. त्यात काही पुऊष आहेत, काही अन्य योजनांचा लाभ घेणारे आहेत, काही इन्कम टॅक्स भरणारे आहेत. निकषात न बसणारे अकाउंट आहे, ते रद्द केलेले नाहीत ते फक्त सस्पेंड केले आहेत. पुन्हा एकदा त्याची शहानिशा केली जाईल, त्यानंतर ते अकाउंट बंद केले जातील, असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.








