केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन : नक्षलग्रस्त राज्यांमध्ये हिंसेत 77 टक्क्यांची घट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील दोन वर्षांमध्ये नक्षलवादाला पूर्णपणे संपवू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीदरम्यान केले आहे. 2022 मध्ये नक्षलप्रभावित क्षेत्रांमध्ये सर्वात कमी हिंसक घटना घडल्या आहेत. यामुळे नक्षलवादाच्या बळींचा आकडाही मागील 4 दशकांमध्ये सर्वात कमी राहिला आहे. नक्षलवादविरोधी लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असल्याचे शाह यांनी शुक्रवारी म्हटले आहे.
नक्षलवाद हा मानवतेसाठी अभिशाप आहे. आम्ही नक्षलवादाचे प्रत्येक स्वरुप समूळ नष्ट करणार आहोत असे शाह यांनी बैठकीत वक्तव्य केले आहे. तर 2022 मध्ये नक्षली हिंसेत 77 टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे. 2010 मध्ये नक्षलवादी हिंसेचे प्रमाण अत्यंत अधिक राहिले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बैठकीत अनेक राज्यांचा सहभाग
नक्षलवादाच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि झारखंडचे मुख्यमंत्री सामील झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बैठकीत सहभागी झाले. तर ओडिशा, बिहार, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मंत्र्यांनी बैठकीत भाग घेतला आहे. मागील 5 वषांमध्ये नक्षलग्रस्त भागांमधील सुरक्षेत विशेष सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये नक्षलवाद रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तराचे धोरण आणि कृती कार्यक्रम तयार केला होता.
जीवितहानीत मोठी घट
2010 च्या तुलनेत 2022 मध्ये नक्षली हिंसेमुळे सुरक्षा दलांचे जवान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूंमध्ये 90 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गृह मंत्रालयाच्या डाटानुसार 2004-14 पर्यंत 17 हजार 679 नक्षली घटना घडल्या आणि 6,984 बळी गेले होते. तर 2014 ते 15 जून 2023 पर्यंत नक्षली हिंसेच्या 7,649 घटना घडल्या आणि 2,020 जणांना जीव गमवावा लागल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दहशतवादावर कठोर प्रहार करा
तत्पूर्वी दहशतवादविरोधी यंत्रणांच्या बैठकीत शाह यांनी नव्या दहशतवादी संघटना उदयास येऊ नयेत म्हणून कठोर भूमिका स्वीकारण्याची सूचना केली होती. दहशतवाद्यांची पूर्ण इकोसिस्टीम नष्ट करावी लागणार आहे. क्रिप्टोकरन्सी, हवाला, टेरर फंडिंग, संघटित गुन्हेगारी आणि नार्को-टेरर लिंकमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले असून याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, परंतु अद्याप बरेच काही करावे लागणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.









