मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा
पणजी : मणिपुरचे निमित्त शोधून काँग्रेस, आप आणि आरजी या तीन पक्षाच्या मिळून पाच आमदारांनी काळे कपडे परिधान करून विधानसभेत गोंधळ उडवून देऊन कला व संस्कृती तसेच क्रीडा खात्याच्या महत्त्वपूर्ण मागण्यांच्यावेळी कोणतीही चर्चा होणार नाही, असा रचलेला डाव गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मोडून काढला. ते स्वत: विधानसभेत उपस्थित राहिले. उर्वरित पाच आमदारानी सभात्याग केला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना निपटून काढू, असा इशारा यावेळी दिला. विधानसभेचे कामकाज मणिपूरमधील दंगलीच्या निमित्ताने रोखून धरून तणावाचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या काँग्रेस व आपच्या आमदारांना विजय सरदेसाई यांनी खेळलेल्या खेळीमुळे चाप बसला. तसेच सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे अखेर विरोधकांच्या केवळ पाच आमदारांना आपण होऊन सभागृहातून बाहेर जाऊन सभागृहाच्या बाहेर असलेल्या स्तंभाजवळ बसून राहावे लागले. विजय सरदेसाई यांनी त्यांना मुळीच साथ दिली नाही. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर या आमदारानी काळे कपडे परिधान करून सभागृहात प्रवेश केला आणि मणिपूर प्रकरणी चर्चा आता झाली पाहिजे, असा आग्रह धरला. सभापतींनी त्यांना आसनावर बसण्यास सांगितले. विजय सरदेसाई यांनी प्रश्न विचारण्यास सुऊवात केली. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तर तासानंतर विचार करू, असे सांगितले.
शून्य प्रहराच्या वेळीही गोंधळ
प्रश्नोत्तर तास झाल्यानंतर शून्य प्रहराच्या वेळी काँग्रेस, आप व आरजी मिळून पाच जणांनी पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुपारी जेवणाची वेळ झाल्यामुळे सभापतींनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर दुपारी कामकाज सुरू झाल्याबरोबर पुन्हा या विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री बनले संतप्त
मुख्यमंत्री संतप्त झाले. त्यांनी जातीयवादाचे विषय आम्ही इथे खपवून घेणार नाहीत, असा इशारा दिला. चर्चच्या फादरने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काढलेले अनुद्गारदेखील आम्ही सहन करणार नाही. मणिपूरचा विषय या विधानसभेत चर्चेस घेऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करू नका, असा इशाराच विरोधकांना दिला. विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले. मात्र संबंधित फादरने माफी मागितलेली असल्याने त्याच्यावर आता कारवाई करू नका, असा सल्ला दिला.
सभापतींनी दिला इशारा
सभापतींच्या आसनापर्यंत जाऊन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा तसेच आपचे दोन आमदार आणि आरजीचा एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापती तवडकर हे संतप्त झाले. ब्रया बोलाने बाकावरती जाऊन बसा, नाहीतर तुमचे नाव पुकारून तुम्हाला सभागृहातून बाहेर काढले जाईल व तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. विरोधकांना विजय सरदेसाई यांचा पाठिंबा मिळाला नसल्याने अखेरीस पाचही जणांनी सभागृहातून काढता पाय घेतला आणि ध्वजस्तंभाकडे जाऊन तिथे आसनस्थ झाले. विजय सरदेसाई यांनी काळा शर्ट परिधान केला नाही. सफेद शर्ट घालून आले होते. त्यामुळे विरोधकांतील फूट पुन्हा एकदा स्पष्ट झाली. काँग्रेस, आप हे एकाकी पडले. अशा तऱ्हेने या विरोधकांची हवा काढून घेतली. कला व संस्कृती तसेच क्रीडा खात्यातील कारभारावर त्यांनी जोरदार भाषण केले आणि सभागृहात विरोधी पक्षाची उणीव त्यांनी भरून काढली.









