मंत्री सतीश जारकीहोळी यांची माध्यमांना माहिती
बेळगाव : हिडकल धरणातून धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी उपलब्ध करून देणे हे आमच्या निदर्शनास आणून देण्यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही योजना स्थगित करण्यासाठी सूचना केली होती. मात्र योजनेशी संबंधित खात्यानी योजना राबविण्यास मंजुरी दिली. हा विषय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर मांडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. येथील जिल्हा पंचायत कार्यालयात मंगळवारी माध्यमांसमोर ते बोलत होते. हिडकल धरणातील पाणी धारवाड औद्योगिक वसाहतीला देण्यास बेळगावातील जनतेकडून विरोध होत आहे. विविध संघ संस्थांच्या प्रमुखांनी या योजनेला विरोध दर्शवून आपल्यासमोर म्हणणे मांडले आहे. त्यामुळे या योजनेबाबत सरकार पातळीवर चर्चा करण्यात येईल. निपाणी, हत्तरगी, संकेश्वरनजिकच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. पावसामुळे मागील वेळीही सेवा रस्त्याची (सर्व्हिस रोड) दुर्दशा झाली होती.
याबाबत एनएचआय अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर सेवा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. आता पुन्हा सेवा रस्त्याची दुर्दशा झाल्याच्या आपल्या निदर्शनास आले असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधितांना सूचना करू, असे ते म्हणाले. म्हादई पाणलोट क्षेत्रातील भंडुरा नाल्याच्या योजनेसाठी शेतकऱ्यांतून विरोध असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. याबाबत बैठक घेऊन शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळवू. जिल्ह्यामध्ये कोविडची दोन प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना हाती घेतली आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. हिरेबागेवाडीनजीक वारंवार अपघात घडत आहेत. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मंत्री जारकीहोळी म्हणाले की, परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करून खबरदारीची योजना हाती घेण्याची सूचना करू, पावसामुळे रस्त्यावर समस्या येत असल्या तरी अपघात घडू नये यासाठी मार्गसूची फलक लावण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना करू, असेही ते म्हणाले.









