मनोज जरांगे-पाटील यांचे आश्वासन
बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच बेळगावमध्ये होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, या मागणीसाठी शुक्रवारी म. ए. समिती व सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे-पाटील यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगावमध्ये मागील 67 वर्षांपासून लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाची मांडणी केली जात आहे. परंतु, अद्याप यश आलेले नाही. त्याचबरोबर रिंगरोड, बायपास रोड यासाठी मराठा शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारकडून घेतल्या जात आहेत. या विरोधात मराठा समाजाने आवाज उठवावा, अशी मागणी जरांगे-पाटील यांच्याकडे करण्यात आली. आपण लवकरच सीमाप्रश्न तसेच बेळगावमधील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण-पाटील, महादेव पाटील, सागर पाटील, कपिल भोसले, अमित जाधव, आनंद पाटील यासह इतर उपस्थित होते.









