तेदेप प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण
►वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष तेलगू देसम पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) पुनर्प्रवेशाची चर्चा मागील काही काळापासून सातत्याने सुरू आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अणि तेदेप अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी या सध्या याविषयी बोलण्याची ही योग्य वेळ नसल्याचे म्हणत योग्यक्षणी याबद्दल बोलणार असल्याचे सांगितले आहे.
विशाखापट्टणम येथे व्हिजन-2047 दस्तऐवज जारी करताना त्यांनी स्वत:ची भूमिका मांडली आहे. 2024 मध्ये राष्ट्रीय राजकारणातील माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आंध्रप्रदेश माझी प्राथमिकता आहे. हाच माझा मोठा अजेंडा असून मी राज्याची पुनर्निर्मिती करणार असल्याचे उद्गार नायडू यांनी काढले आहेत.
रालोआच्या संस्थापकांपैकी एक राहिलेले चंद्राबाबू नायडू यांनी जून महिन्यात भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेदेप रालोआत परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजधानीच्या मुद्द्यावरून वक्तव्य
अमरावतीला राज्याची राजधानी करण्यावरून नायडू यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांच्यावर निशाणा साधला आहे. जगनमोहन हे विधानसभेत बसले आहेत, सचिवालयात ते जात आहेत, मंत्रिमंडळाची बैठक अमरावती येथे घेत आहेत, मग अशा स्थितीत अमरावती ही राज्याची तात्पुरती राजधानी आहे का असे प्रश्नार्थक विधान नायडू यांनी केले आहे. जगनमोहन रे•ाr हे निरर्थक दावे कर तआहेत. मागील 10 वर्षांपासून आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. सर्वकाही ठरले देखील आहे. आम्ही आंध्रप्रदेशसाठी जागतिक स्तराची राजधानी निर्माण करण्याची योजना तयार केली. हैदराबादला सर्वात चांगली इकोसिस्टीमचा दर्जा मिळवून देण्यासाठी यापूर्वी 9 वर्षांपर्यंत व्यवस्थित नियोजन केले होते असे नायडू म्हणाले.
राजधानीवरून वाद
2014 मध्ये आंध्रप्रदेशातून तेलंगणा हे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले होते. आंध्रप्रदेश पुनर्रचना अधिनियमाच्या अंतर्गत हैदराबाला तेलंगणाची राजधानी करण्यात आले आहे. तर आंध्रप्रदेशला 10 वर्षांमध्ये स्वत:साठी नवी राजधानी शोधणे क्रमप्राप्त होते. यापूर्वीच्या तेदेप सरकारने अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. परंतु 20219 च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्ष विजयी होत राज्यात सत्तेवर आला. यानंतर मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांनी राज्यात तीन राजधान्या निर्माण करण्याची घोषणा केली होती.
2019 निवडणुकीपूर्वी रालोआला रामराम
तेदेपने 2019 च्या निवडणुकांपूर्वी रालोआतून काढता पाय घेतला होता. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याने नाराज नायडू यांनी मोदी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता. परंतु मागील काही काळात तेदेपने भाजपसोबत जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे मानले जात आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान तेदेपने मोदी सरकारला अनुकूल अशी भूमिका घेतल्याने पुढील काळात चंद्राबाबू नायडू हे रालोआच्या व्यासपीठावर दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









