बंगालच्या मंत्र्याच्या टिप्पणीवरून वाद : भाजपकडून लक्ष्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या टिप्पणीवरून वाद झाला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना फिरहाद यांनी सध्या मुस्लीम अल्पसंख्याक असले तरीही भविष्यात निश्चित बहुसंख्याक होतील, आम्हाला न्यायासाठी मेणबत्ती पेटवावी लागणार नसल्याचे म्हटले आहे.
फिरहाद यांच्या या टिप्पणीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजप नेत अमित मालवीय यांनी हकीम यांच्या या टिप्पणीवर टीका केली आहे. हकीम यांचे हे वक्तव्य शरीया कायद्याच्या समर्थनाच्या दिशेने इशारा करत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला. फिरहाद यांनी कोलकाता येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिप्पणी केली होती.
पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम 33 टक्के आहेत. तर पूर्ण देशात आम्ही 17 टक्के आहोत. आम्ही संख्येच्या स्वरुपात अल्पसंख्याक असू शकतो, परंतु आम्ही निश्चितपणे एक दिवस इतके सशक्त होऊ की आम्हाला न्यायासाठी मेणबत्ती पेटवावी लागणार नाही. आमचा आवाज आपोआप ऐकला जाईल आणि न्यायासाठी आमच्या हाकेला प्रतिसाद मिळेल अशा स्थितीत आम्ही असू असे उद्गार फिरहाद यांनी काढले होते.
मुस्लीम न्यायाधीशांची संख्या वाढावी
कलकत्ता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात निवडक मुस्लीम न्यायाधीश असल्याचे म्हणत फिरहाद यांनी सशक्तीकरण आणि कठोर मेहनतीने ही स्थिती बदलली जाऊ शकते असे उद्गार काढले आहेत. अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य राष्ट्राच्या प्रगतीला सुविधाजनक करण्यासाठी अन्य समुदायांसोबत मिळून काम करतात असे आम्ही मानत असल्याचे ते म्हणाले.
भाजपकडून आरोप
तृणमूल नेते फिरहाद हे उघडपणे सांप्रदायिक द्वेष भडकाविणे आणि धोकादायक अजेंड्याला पुढे नेण्याचे काम करत आहेत. हे केवळ द्वेष पसरविणारे भाषण नाही का? भारतात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. याप्रकरणी इंडी आघाडीने मौन का बाळगले आहे? आमचा देश स्वत:ची एकता आणि सार्वभौमत्वासाठी अशाप्रकारच्या धोक्यांना सहन करणार नसल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी केले आहे.









