पुणे / प्रतिनिधी :
जागतिकीकरणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या थैमानाला उत्तर देण्यासाठी मन आणि बुद्धीला तयार करणाऱ्या तत्त्व संग्रहाची आवश्यकता आहे. सध्या जागतिकीरणाच्या नावाने उठलेल्या थैमानाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न जगाने केला. भारत त्याचे उत्तर देईल, अशी जगाची अपेक्षा आहे. मात्र भारतीयांना याची जाणीव आहे का, हा प्रश्न आहे. त्यामुळे आता उत्तर देणारा भारत निर्माण करायचा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्या वतीने समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मीकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती, संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, सज्जनगड संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त बाळासाहेब स्वामी आणि मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे यावेळी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, पौराणिक काळातील थैमानाला श्रीराम-हनुमानाने उत्तर दिले आहे. ऐतिहासिक काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिल्याचा इतिहास आहे. आता जागतिकीकरणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या थैमानाला उत्तर देण्यासाठी मन आणि बुद्धीला तयार करणाऱ्या तत्त्व संग्रहाची आवश्यकता आहे. तो संग्रह आपल्याकडे आहे. मात्र, त्याचे आकलन आपल्याला झाले पाहिजे. त्यानुसार वागण्यासाठी संस्कारांची योजना हवी. रचनेतून व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे.
येत्या काही काळात उत्तर देणारा भारत उभा करायचा आहे, याची जाणीव ठेवावी लागणार आहे. धर्माचे संरक्षण म्हटले की लढाई दिसते. मात्र, संरक्षण म्हणजे केवळ लढाई नाही. धर्म जाणून कालसुसंगत स्वरूपात मांडायचा, हा एक संरक्षणाचा पैलू आहे. शाश्वत धर्माचे कालसुसंगत आचरण सांगून होत नाही. धर्म कालांतराने विस्मरणात जातो. त्यामुळे सत्य काय आहे, हे संशोधन करून सांगावे लागते. प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण म्हणजे धर्म आहे,’ असेही भागवत यांनी स्पष्ट केले.