मी ऐवजी आम्ही, आमचे म्हणण्याने मिळते संतुष्टी
कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात त्याचे कुटुंब, मित्र आणि नातलग सर्वात जवळचे असते. नाते कुठलेही असो ते निभावण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेषकरून पती आणि पत्नीमधील नातेसंबंधामध्ये.
अलिकडेच पर्सनल टॉकवर झालेल्या एका मनोवैज्ञानिक संशोधनात मी आणि माझे यासारख्या एकवचनी शब्दांचा वापर करण्याऐवजी आम्ही, आमचे यासारख्या बहुवचनी शब्दांचा वापर केल्याने जीवनात संतुष्टता प्राप्त होते असे आढळून आले आहे. संशोधकांनी याला वी-टॉक हे नाव दिले आहे. संशोधक दीर्घकाळापासून जीवनाच्या अनुभवांबद्दल बोलण्यासाठी बहुवचनी शब्दांचा वापर करणारे आणि एकवचनी शब्दांचा वापर करणाऱया पती-पत्नीमधील अंतरावर संशोधन करत होते.

वी-टॉकमध्ये भावबंध
प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी आणि स्वभाव परस्परांपेक्षा वेगळा असतो, तरीही सर्वजण घरामध्ये परस्परांसोबत संतुलन राखून जगत असतात. अनेकदा वर्तणूक प्रचंड वेगळी असल्याने आणि विचार परस्परांशी जुळणारे नसल्याने नातेसंबंध बिघडतात आणि कित्येकदा तुटतात. याचमुळे वी-टॉक केल्याने पती आणि पत्नी दोन वेगळे युनिट नसून एकच असल्याचा संदेश आमच्या मेंदूत पोहोचतो. वी-टॉकमुळे दीर्घकाळापर्यंत नातेसंबंध टिकून राहतात आणि अनेकदा दोघांच्या भावना देखील परस्परांशी जुळतात. उदाहरणार्थ एकाला वेदना होत असल्यास दुसरा न सांगताच ओळखतो असे संशोधकांनी म्हटले आहे.
शालीन भाषेचा विकास
मुलांच्या पालन-पोषणात देखील वी-टॉकमुळे प्रभाव पडतो. यामुळे मुलांमध्ये शालीन भाषेचा विकास होतो. वी-टॉकसंबंधी एका कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे केलेल्या विश्लेषणात 6-12 महिन्यांमध्ये नातेसंबंधात सुधारणा दिसू लागत असल्याचे आणि मुले देखील अधिक चांगली वागू लागल्याचे आढळून आले आहे.









