समाजकार्यकर्ते, पत्रकार मोहन वेरेकर यांचे आवाहन: गोमंतक मराठा समाजातर्फे भाऊसाहेब पुण्यतिथी
पणजी : गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचा आदर्श व त्यांच्यातील एक गुण जरी अंगिकारला तर त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक होईल, असे मत ज्येष्ठ नागरिक समाज कार्यकर्ता तथा पत्रकार मोहन वेरेकर यांनी येथे व्यक्त केले. गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे संस्थेच्या येथील राजाराम सभागृहात मंगळवारी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची 52 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन वेरेकर बोलत होते. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे भाऊंचे नातू तथा उद्योजक यतीन काकोडकर, अॅड. मनोज बांदोडकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुभाष साळकर, पदाधिकारी केशव नाईक, उमाकांत धारगळकर, गणपत देविदास, रंजन नाईक उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते समाजबंधू मोहन नरहरी पेडणेकर (पेडणे) यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख 25 हजार ऊपये असे त्याचे स्वरूप होते. यावेळी बोलताना यतीन काकोडकर म्हणाले, गोवा मुक्त झाला त्यावेळी इथे काहीच साधनसुविधा नव्हत्या, उद्योग धंदे नव्हते, शिक्षणाची तशी सोय नव्हती. अशावेळी भाऊंनी साधनसुविधा निर्माण केल्या. सीबा, एमआरएफ, जुवारी अशा कंपन्या आणल्या. पणजी जिमखाना प्रकल्प साकारून कसोटी वीरांना आणून सामने खेळवले, कला संस्कृतीच्या उद्धारासाठी कला अकादमी उभारली. त्यांनी घातलेला शिक्षणाचा भक्कम पाया हे त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणता येईल. सामाजिक न्यायाच्या पुरस्कारामुळे ते सदैव आठवणीत राहतील. प्रा. सुभाष साळकर यांनी स्वागत केले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून व समई प्रज्वलित करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रम समन्वयक प्रशांत मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष उमाकांत धारगळकर यांनी आभार मानले.
भाऊसाहेबांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा रंगली
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीनिमित्त तालुका स्तरावर, भाऊंच्या जीवनावर विद्यार्थ्यांसाठी वत्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची अंतिम स्पर्धाही मुख्य सोहळ्यापूर्वी घेण्यात आली. त्यात बालभारती विद्यामंदिर रायबंदर च्या वरदा पंकज चव्हाण हिने प्रथम पारितोषिक पटकावले. सावईवेरे येथील कृष्णा ररघुनाथ शेट्यो सावईकर विद्यालयाची सांधवी विनायक सावंत हिला द्वितीय तर हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या श्रीयांश सुभाजी याला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे केशव स्मृती हायस्कूल दाबोळीचा आयुष च्यारी, युनायटेड हायस्कूल कुंकळीची विस्मया भट व सर्वोदय एज्युकेशन इन्स्टिट्यूट हायस्कूलची सान्वि विनायक पै यांना देण्यात आली. नितीन कोरगावकर, राजू भिकारो नाईक व सुनील नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.









