ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना संपताना दिसत होती, त्यामुळे आम्ही उठाव केला. बंड केलं नाही. आजही आमची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी डोळय़ावरची पट्टी काढून आजूबाजूच्या चार कोंडाळ्यांना दूर करावे. या चार कोंडाळ्यांनीच उद्धव ठाकरेंना बावळट केलं आहे. त्या लोकांची लायकी नाही निवडून येण्याची, ते आमच्या मतदानावर खासदार म्हणून निवडून येतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
शिंदे-फडणवीस सरकारने आज बहुमत सिद्ध केले. त्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष एक नंबरला होता. आता दोन वर्षात आम्ही चार नंबरला गेलो. आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौऱ्याचा रेकॉर्ड काढून पाहा, माझ्या मतदार संघात आले नाहीत. पण एकनाथ शिंदे पाच-पाच वेळा आले आणि अशा माणसाला तुम्ही पदासाठी बंड केला, असे म्हणता. चाळीस आमदार फुटले ही काही आजची आग नाही, हे एकनाथ शिंदेंनी आधीच सांगितलं आहे.
शिवसेना संपतेय हे दिसत असल्यानंच हे पाऊल आम्ही उचललं. आमचं हे दुःख सर्वांना समजलं असेल की का गेलो. आम्ही परत आमच्या घरात आलो. 50 आमदार असलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद देऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, असं म्हणत पाटलांनी मोदी आणि फडणवीस यांचं कौतुक केलं.








