त्या दिवशी भेटायला आलेल्या मीना ताईंची स्थिती फारच विचित्र झाली होती. त्यांच्याकडे पाहताक्षणी त्या खूप अस्वस्थ आहेत हे लक्षात येत होते. खुर्चीमध्ये कसंबसं बसत त्यांनी माझा हात घट्ट पकडला, ‘मॅडम आ..ज..आ..ज सगळं मनातलं बोलायचं आहे तुमच्याजवळ. जे जे आहे ते कबुल करायचंय. मला.. मला प्लीज समजून घ्याल ना? प्लीज. असं म्हणत रडू लागल्या. पाच मिनिटे तशीच निघून गेली.
शांत व्हा. अगदी मोकळेपणाने बोलु शकता तुम्ही. त्यासाठी आधी रडणे थांबवायला हवे ना?
अं,.,हो हो..असं म्हणतं कसबसं उसनं अवसान आणून त्यांनी रडू आवरलं.
हं. आता मला सांगा काय झाले आहे?
मॅडम..मी त्या काळची डबल ग्रॅज्युएट!! पण नुसतीच सुशिक्षित हो..सुसंस्कृत नाही. तशी असते ना तर अशी चूक केलीच नसती. खूप खूप चुकले मी. कधी माझा ‘अहंकार’ तर कधी ‘ईर्ष्या’ आड येत गेली. साधं कौतुक करता आलं नाही तिचं. पोरीनं खूप केलं आमच्यासाठी. पण मी..मी एकच म्हणत राहीले करायलाच हवे. तिचाच तर संसार आहे! पण आता संसार करायला राहीलीच कुठे ती?
कशी सावरु हो मी..माझी सून कायमची या जगातून निघून गेली. मीनाताई पुन्हा रडू लागल्या.
मॅडम..अतिशय हुशार आणि कतृत्ववान होती सांघवी! लेखन, वत्तृत्व, शिकविण्याची कला, उत्तम संभाषण कौशल्य, जिद्द अनेक गुण होते. दहा वर्षांपूर्वी लग्न होऊन ती आमच्या घरी आली. एक कमालीचं वेगळेपण होतं तिच्यामध्ये. तसं पाहिलं तर माहेरी खूप संपन्नतेमध्ये वाढलेली मुलगी! परंतु कसलाही गर्व नव्हता. संसारचक्र सुरु झालं आणि तीही त्यात अडकत गेली. आम्ही जिथे राहतो तो तसा गावभागच असल्याने तिच्या शिक्षणाला तसा काहीच स्कोप नव्हता. तिच्या पद्धतीने तिचे काम सुरु होते. सोशल अॅक्टीव्हीटी, कुणाला लागेल ती मदत करणे हे सुरुच असायचे. लोकं तिचे कौतुक करायचे. तिच्या शब्दाला विशेष किंमत होती. कौतुकाने बोलायचे तिच्याविषयी. काय माहिती..कदाचीत नकळत आतल्या आत कुठेतरी मला कमीपणा वाटायचा. मनातल्या मनात तुलना व्हायची. तसं पाहिलं तर कधी भांडणं नाही आमच्यात. माझा ‘इगो’ सांभाळत ती सर्व करायची. वाढदिवस आवडीने साजरे करायची. कुठे जायचं झालं तरी तिने कामे कधी मागे ठेवली नाहीत. उरकही दांडगा होता. भराभर सगळं आवरायची. माझ्या काही मैत्रिणी म्हणायच्याही मीना भाग्यवान आहेस तू! अशी सून लाभायला भाग्य हवं. पुन्हा मला आतल्याआत राग यायचा. ‘वाटायचं त्यात काय इतकी वर्षे आपणही केलेच की..करायलाच हवे ना. तिचाच तर संसार आहे.’ खरं म्हणाल तर एकेकदा मला ही आतून वाटायचे खरंच आपण भाग्यवान आहोत. दहा वर्षे बारीकसारीक कामांव्यतिरीक्त कसलीच जबाबदारी नव्हती माझ्यावर. पण मी कौतुक नाहीच केलं हो कधी.
माझ्या मुलाचा स्वभावही काहीसा माझ्यासारखाच. त्यानेही फार कधी कौतुक केलं नाही की कधी वर्षाकाठी मनसोक्त हिंडायलाही नेले नाही. काम आणि काम. हल्ली ती म्हणायचीही. मलाही कंटाळा आलाय तेच तेच करुन. कधीतरी बदल नको का? कसली गं हल्लीची मुलं तुम्ही. कसले कंटाळे येतात तुम्हाला? घरात सगळ्या सोई आहेत मग कंटाळायला काय झालं? ही त्यावर माझी टिप्पणी असायची.
खरंतर आताच्या पीढीतली मुलं किती एन्जॉय करतात, हिंडतात, फिरतात हे पाहतो आम्ही. मी स्वत:हून म्हणायला हवे होते. जा कधीतरी फिरायला. पण नाही माझा ‘अहं’ आड यायचा. मला वाटायचं, ‘संसार म्हटल्यावर हे सारं आलंच. आम्ही नाही कुरकुरलो कधी. मी दुर्लक्ष करायचे’. त्या दिवशी ती नेहमीसारखं झाडांना पाणी घालत होती. तसं काहीच होत नव्हतं तिला. अगदी व्यवस्थित होती. अचानक तिथेच कोसळली..उपचारांना संधी मिळालीच नाही. तिथेच सर्व संपले होते. निघून गेली कायमची खरीखुरी लांबच्या प्रवासाला..एकटीच. असं म्हणतं त्या पुन्हा रडू लागल्या. मॅडम, आज ती गेल्यावर कळतंय काय गमावलंय मी! माझा मी पणा, तोरा साफ उतरला. मी मोठी संसार केलेली आहे की जीवंत!! तरी घर पोरकं झालं..मी पोरकी झाले. आता सारं आठवतंय. किती शुल्लक, साध्या साध्या गोष्टी असतात हो. खरेखुरे कौतुकाचे शब्द, केलेल्या चांगल्या कामाला भरभरुन दाद किंवा तुझं हे आवडतं हा मला..हे व्यक्त करायला जीभ का जडावली माझी? ती आल्यापासून मी खऱ्या अर्थी निवांत झाले.
पण त्याबद्दल कधी साधी कृतज्ञता व्यक्त केलीच नाही. तिचाच तर संसार आहे. करायलाच हवं हेच म्हणत राहीले. मीनाताई सलग घडाघडा बोलत होत्या. मनातली खदखद, खंत, कमालीचा झालेला पश्चाताप बाहेर येत होता. मीनाताईंसारखी अनेक माणसे भेटत असतात. ज्यांच्या हातून अगदी वाळूसारखी अलगद वेळ, माणसं निसटून जातात आणि व्यक्त न झाल्याची खंत सावलीसारखी पाठराखण करते.
खरंतर बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, खळखळून हसण्याचे वरदान माणसालाच लाभले आहे. कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे आपण करु शकतो. परंतु असं असूनही कितीजणं दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करतात? एखाद्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात? आपली एखादी मैत्रीण जिच्याकडे खूप चांगली कौशल्ये आहेत, बहिण भाऊ, सासू सून, पती पत्नी अशी अनेक नाती ज्यामध्ये त्या व्यक्तींमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचे मोकळेपणाने कौतुक किती जणं करतात? प्रत्येकाने हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. क्वचित ‘संकोच’ यामध्ये अडथळा असतो परंतु बऱ्याचदा ‘अहं’ तर अनेकदा ‘ईर्ष्या’ हा कौतुक करण्यामधला अडथळा असतो. खरेखुरे कौतुकाचे दोन शब्द नात्याची वीण घट्ट करतात. प्रोत्साहन देतात.
ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याजवळ असते त्यावेळी माणसाला त्याचे मोल वाटत नाही. कधी कधी अगदी सुरळीत सारं चाललेलं असतं म्हणूनच की काय, असं आयुष्य वा माणसं आपल्याला लाभणं ही किती मोलाची गोष्ट आहे हेच आपण विसरतो. आपली अशी माणसं असणं, कुणीतरी आपल्यासाठी करणं यातलं सुख आपण इतकं गृहीत धरुन चालतो की वरील उदाहरणातील मीनाताईंसारखं त्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटायला हवं, ते व्यक्तही करायला हवं हेच विसरतो! एखाद्या दिवशी अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते आणि नंतर ‘तिचं असणं’ किती मोलाचं होतं हे उमगतं. म्हणून आपल्या भोवतालच्या गोष्टी, व्यक्ती, क्षण आयुष्यात जे जे चांगलं लाभलं आहे ते सारंच, त्याकडे जाणीवपूर्वक कृतज्ञतेने पहायला हवे. दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला हवे. कौतुक करता येत नाही, व्यक्त होता येत नाही ही सबब सांगण्यापेक्षा ते कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. कारण आपण कुणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन आलो नाही..कुठल्याही क्षणी ‘आहे’च चे ‘नाही’ होऊ शकते, याचे भान ठेवायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या आवडलेल्या गोष्टीचे मनापासून केलेले कौतुक त्याला प्रोत्साहन देतेच परंतु आपल्यालाही आनंदी करते.
आजमावायचे असेल तर करुन पहा..आजवर कुणाकुणाला धन्यवाद द्यायचे राहिले आहेत, कुणाची एखादी गोष्ट आवडली, कौतुक करावेसे वाटले परंतु केले नाही..अशा व्यक्तींची लिस्ट आपण करु शकतो आणि मोकळेपणाने कृतज्ञता व्यक्त करु शकतो. त्यासाठी श्री गणेश चतुर्थी सारखा मंगलमय दुसरा दिवस नाही. मग या शुभदिनापासून करताय ना सुरुवात? प्रयत्न करायला काय हरकत आहे..मग करणार ना प्रयत्न?
गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा!! बाप्पा आपल्या सर्वांनाच कृतज्ञता जपण्याचा, जोपासण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आशीर्वाद देवो हीच सदिच्छा!!!
अॅड. सुमेधा संजीव देसाई








