कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
सून आली तर घर उजळते, असे म्हणतात. मात्र, माझ्या सुनेने देश उजळला, याचा आपल्याला अभिमान आहे. अशा शब्दात कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे गौससाब बागेवाडी यांनी आपल्या सुनेचे कौतुक केले. शनिवारी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी व कोण्णूर मरडीमठाचे डॉ. पवाडेश्वर स्वामीजींनी गौससाब यांचा सत्कार केला. सत्कारानंतर बोलताना ते पुढे म्हणाले, आपण जातीने मुसलमान आहोत. आपल्याला मुले नव्हती. त्यावेळी तवग येथील बाळय्या आज्जा यांच्या आशीर्वादाने मुले झाली. आज तोच मुलगा सेनादलात कर्नल आहे. आम्ही सारे देशभक्त बनणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशाला बेळगाव जिल्ह्याचे मोठे योगदान
यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, देशाला बेळगाव जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे. माझ्या जिल्ह्याची सून सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला दिली. त्यामुळे त्यांनी बेळगावचा नावलौकिक वाढवला आहे. देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांना बळ मिळावे, यासाठी आपण प्रार्थना करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी सोफिया यांच्या सासू-सासऱ्यांचा सत्कार करण्यात आला.









