पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे मत : विचारवेध व्याख्यानमाल
प्रतिनिधी /मडगांव
भारतीय शास्त्रज्ञांमध्ये गुणवंता व बुद्धिमत्ता ठासून भरलेली आहे. परंतु, भारतीय शास्त्रज्ञ आपल्या देशात चांगली कामगिरी करू शकत नाही. पण ते अमेरिकेत गेल्यावर प्रभावी कामगिरी करतात. आपल्या देशात त्यांच्यासाठी पोषक असे वातावरण नाही. जे अमेरिकेत उलपब्ध होत असते. आज आपल्या गतवैभव प्राप्त करायचे असल्यास शास्त्रज्ञासाठी पोषक असे वातावरण निर्माण करावेच लागणार असल्याचे मत अणुऊर्जा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. डॉ. अनिल काकोडकर यांनी गोमंत विद्या निकेतनच्या विचार वेध व्याख्यान मालेत ‘इंडियन सायन्स : 75 वर्षे व त्यापुढे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले.
जगात भारतीयांचा दर्जा सर्वोत्तम आह. भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार व्हायला पाहिजे. आपण शर्यतीत असण्याबद्दल जागरूक असले पाहिजे आणि असुरक्षित होणार नाही याची खात्री केली पाहिजे असे डॉ. काकोडकर यावेळी म्हणाले.
भारत पूर्वी एक कृषीप्रधान वैभवशाली देश होता. नंतर औद्योगिक क्रांती झाली. पण, औद्योगिक क्षेत्रात देश फार मोठी झेप घेऊ शकला नाही. त्याला अनेक कारणे आहेत. औद्योगिक क्रांती नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्रांती झाली. त्यातही फार प्रगती करता आली नाही. त्यासाठी पोषक असे वातावरण आपण देशात निर्माण करू शकलो नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी पोषक असे वातावरण निर्माण करू शकलो तर आपला देश नक्कीच जगातील सर्वोत्कृष्ट देश होईल.
आपले सामर्थ्य, भूतकाळातील वारसा, नवीन क्षमता यांची सांगड घालण्याची गरज आहे. जग आज योग्य मार्गाने जात नाही. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या धोरणांना निश्चितपणे आकार देण्याची गरज आहे, जर आम्ही सामर्थ्यवान नसाल तर आमचे कोणीही ऐकणार नाही. त्यासाठी आम्हाला आमचे सामर्थ्य सिद्ध करावे लागेल. तरच जग आमचे ऐकेल असे डॉ. अनिल काकोडकर म्हणाले.
आपल्या देशात अनेक समस्या आहेत. या समस्यांचे अनेक स्तरांवर निराकरण करावे लागेल. त्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोष देऊन उपयोगी नाही. भारतीयांना एकापेक्षा जास्त प्रतिस्पर्धी आणि बुद्धिवान व्यक्ती म्हणून ओळखले जाते आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या व्यक्तींना परदेशी प्रयोगशाळेत टाका. ते आश्चर्यचकित कामगिरी करतात. ते परदेशातील पोषक वातावरणामुळे घडते. हेच वातावरण आम्ही तयार करणे आवश्यक आहे. जर हे वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही तर आपण स्वत:लाच दोषी ठरवावे लागेल. सुरवातीला प्रवास नायक यांच्या हस्ते डॉ. अनिल काकोडकर यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.









