भाजपच्या गंभीर आरोपानंतर अमेरिकेचे स्पष्टीकरण : अदानी समुहाचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांना लक्ष्य करत भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांमागे अमेरिकेच्या विदेश विभागाकडून वित्तपोषित संघटना आणि वॉशिंग्टनच्या सरकारी संस्थांमध्ये सामील घटकांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. हे आरोप आता अमेरिकेने फेटाळले आहेत.
अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रवक्त्याने हे आरोप निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे प्रशासन जगभरात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी पक्षधर राहिले असल्याचा दावा अमेरिकेच्या दूतावासाने केला आहे. अमेरिकेच्या सरकारी संस्थांमध्ये सामील घटकांनी भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्यासाठी मीडिया पोर्टल ओसीसीआरपी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप भाजपने केला होता.
ओसीसीआरपीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह
अदानी समुहाला लक्ष्य करणे आणि सरकारसोबत त्यांच्या जवळीकीचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी ओसीसीआरपीच्या अहवालाचा वापर केल्याचा दाखला भाजपने दिला होता. अमेरिकेचे सरकार स्वतंत्र संघटनांसोबत काम करते, जे पत्रकारांसाठी व्यावसायिक विकास आणि क्षमतानिर्माण प्रशिक्षणाचे समर्थन करते. हा कार्यक्रम या संघटनांच्या संपादकीय निर्णय किंवा दिशेला प्रभावित करत नसल्याचा दावा अमेरिकेच्या दूतावासाच्या अधिकाऱ्याने केला आहे.
भाजपकडून आरोप
अमेरिकन डीपस्टेटने भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्यासाठी मीडिया पोर्टल ओसीसीआरपी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप भाजपने केला होता. ओसीसीआरपीला अमेरिकेच्या विदेश विभागाचा युएसएड आणि जॉर्ज सोरोस तसेच रॉकफेल फौंडेशन यासारखे डीप स्टेट फिगर वित्तपुरवठा करत असल्याचे भाजपने फ्रेंच माध्यमाच्या अहवालाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. ओसीसीआरपीचे मुख्यालय अॅमस्टरडॅममध्ये ओ. गुन्हे आणि भ्रष्टाचाराशी निगडित वृत्तांवर याचे लक्ष केंद्रीत असते.
अदानींवर अमेरिकेचा आरोप
अमेरिकन सरकार ओसीसीआरपीला नियंत्रित करत असल्याचे फ्रेंच शोध पत्रकाराने उघड केले आहे. मागील महिन्यात अमेरिकेने भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी समवेत अन्य काही जणांवर भारतात अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप केला होता.
स्वतंत्र प्रसारमाध्यमे आवश्यक
अमेरिका दीर्घकाळापासून जगभरातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही राहिला आहे. एक स्वतंत्र प्रसारमाध्यम कुठल्याही लोकशाहीचा एक अनिवार्य घटक आहे. यामुळे रचनात्मक चर्चा सक्षम होते आणि सत्तेवर असलेल्या लोकांना उत्तरदायी ठरविता येते असे अमेरिकेच्या दूतावासाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
लोकसभेत राहुल गांधींना विचारणा
लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ओसीसीआरपी अन् जॉर्ज सोरोसप्रकरणी 10 प्रश्न विचारणार आहे. मीडिया पोर्टल संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार वृत्तांकन प्रकल्प आणि हंगेरी-अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरोस विरोधी पक्षासोबत मिळून भारताच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचविणे आणि मोदी सरकारला बदनाम करू पाहत असल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी केला आहे. लोकसभा नियम 357 अंतर्गत राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मला असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.
शशी थरूर यांच्याकडून भाजप लक्ष्य
भाजपला लोकशाही समजत नाही तसेच कूटनीतिक देखील समजत नाही हे स्पष्ट आहे. भाजप तुच्छ राजकारणात इतके अंध झाले आहेत की ते लोकशाहीत मुक्त प्रसारमाध्यम आणि मुक्त नागरी संघटनांचे महत्त्वच विसरून जातात. मुख्य देशांसोबत चांगले संबंध राखण्यात सत्तारुढ पक्षाच्या जबाबदारीची त्यांना जाणीवच नाही. ही आक्रमक भूमिका भारतासाठी उपयुक्त नाही असे वक्तव्य काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले आहे.









