अनंतपूरच्या कुटुंबांचा अजब दावा : हरियाणाच्या बाबाच्या नादाने निर्णय
बेळगाव : ‘सदेह वैकुंठाला आम्ही जाणार आहोत, आमचे बाबा येऊन आम्हाला घेऊन जाणार आहेत, त्याची तारीखही ठरली आहे. 8 सप्टेंबरनंतर आम्ही येथे असणार नाही,’ असे अनंतपूर, ता. अथणी येथील एका कुटुंबीयांनी जाहीर केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांकडे धाव घेत त्यांची समजूत काढली आहे. अनंतपूर येथील तुकाराम इरकर व त्यांचे कुटुंबीय हे हरियाणातील रामपाल महाराजांचे अनुयायी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुकाराम, त्यांची पत्नी सावित्री, मुलगा रमेश, सून वैष्णवी आदी कुटुंबीय बाबाची भक्ती करतात. बाबावर त्यांचा मोठा विश्वास आहे. आपण रहात असलेल्या शेतातील घरात बाबासाठीच त्यांनी एक खोलीही ठेवली आहे. त्या खोलीत बाबासाठी कपडे, पाणी, चप्पल ठेवले जातात. त्यांच्यासाठी एक आसनही आहे. त्याच खोलीत हे सर्व कुटुंबीय रोज प्रार्थना करतात. 3 ऑगस्टला प्रार्थनेच्या वेळी आपल्याला साक्षात्कार झाला. 8 सप्टेंबर रोजी रामपाल महाराजांचा वाढदिवस आहे. ‘त्याच दिवशी आपण तुमच्याकडे येणार आहे. सदेह तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार आहे,’ असे बाबांनी सांगितले आहे, असा प्रचार तुकाराम व त्यांच्या कुटुंबीयांनी केला.
अनुयायांचा व्हॉट्सअॅप ग्रुप
रामपाल महाराजांच्या अनुयायांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपवरही सदेव वैकुंठ जाण्याच्या साक्षात्काराची चर्चा करण्यात आली. त्यामुळे उत्तर प्रदेश, पुणे, मुंबई येथील आणखी काही जण वैकुंठाला जाण्यासाठी अनंतपूरला आले. रोज बाबांची प्रार्थना करू लागले. गावकऱ्यांमुळे ही गोष्ट प्रशासनापर्यंत पोहोचली. 8 सप्टेंबर रोजी आम्ही वैकुंठाला जाणार, बाबा आम्हाला सदेह घेऊन जाणार या विश्वासात तुकाराम व त्याचे कुटुंबीय असतानाच अधिकारी शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी दाखल झाले.
अथणी तालुक्यातील अनंतपूर हे गाव बेळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव. अनंतपूरनंतर जत तालुक्याची सीमा सुरू होते. गावापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर शेतवडीत तुकाराम यांचे कुटुंबीय राहतात. चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी, पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापूर, तालुका आरोग्याधिकारी बसनगौडा कागे आदी अधिकाऱ्यांचे पथकच अनंतपूरमध्ये दाखल झाले.
या अधिकाऱ्यांनी कवलगुड येथील श्री अमरेश्वर महाराजांनाही आपल्यासोबत नेले होते. सरकारी अधिकारी व अमरेश्वर महाराजांनी तब्बल एक-दीड तास तुकाराम व त्यांच्या कुटुंबीयांची मनधरणी केली. तरीही ते मानायला तयार नव्हते. बाबांचा आम्हाला साक्षात्कार झाला आहे. 8 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी ते आमच्याकडे येणार आहेत. आम्हाला स्वर्गात नेणार आहेत. या मतावर ते ठाम होते.
सध्या बाबा कारागृहात आहेत. भक्ती करा, याला आमचा विरोध नाही. पण सदेह वैकुंठ किंवा स्वर्गाचा प्रवास कोणत्याच बाबाला शक्य नाही, असे सांगूनही ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 8 सप्टेंबरनंतर आम्ही कोणालाही दिसणार नाही, या मतावर ते ठाम होते. त्यांची मनधरणी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. पुणे व उत्तर प्रदेशमधून आलेल्या इतर पाच अनुयायांनाही त्यांच्या गावी पाठवण्यात आले. सदेह वैकुंठ जाण्याच्या भ्रमात काही अघटित घडू नये, यासाठी अनंतपूर येथे पोलीस तैनात करण्यात आले आहे.
कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष
कवलगुड येथील श्री अमरेश्वर महाराज,पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तुकाराम व त्यांचे कुटुंबीय थोड्या प्रमाणात सदेह वैकुंठाच्या भ्रमातून बाहेर पडले असले तरी बाबा येणार, आम्हाला घेऊन जाणार, आम्हाला मोक्ष मिळणार ही समजूत काहीअंशी त्यांच्या मनात अजूनही घर करून आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. यावेळी पत्रकारांना माहिती देताना प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सांगितले की, आम्ही व महाराजांनी त्यांची समजूत काढली आहे. इतर राज्यातून आलेल्या अनुयायांनाही परत पाठवण्यात आले आहे. देहत्यागाच्या निर्णयापासून हे कुटुंबीय मागे हटले आहेत.









