प्रदेश भाजप अध्यक्ष तानावडे यांचे मत
प्रतिनिधी /मडगाव
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप दक्षिण गोव्यात विजय मिळविणार असल्याचे विधान हल्लीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. या विधानावर प्रतिक्रीया व्यक्त करताना मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोव्यातील मतदारांना भाजपने ग्राहय़ धरू नये असे म्हटले होते. या संदर्भात बोलताना प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, श्री. कामत व श्री. सरदेसाई जे बोलते ते बरोबर आहे. भाजप दक्षिण गोव्यातील मतदारांना ग्राहय़ धरीत नाही. पण, दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार विजयी होईल हे स्पष्ट आहे.
मडगावात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, भाजप एक निवडणूक संपली की, दुसऱया निवडणुकीच्या तयारी लागतो. मग ती निवडणूक कितीही छोटी असू देत. भाजप त्याकडे दुर्लक्ष करीत नाही. अन्य राजकीय पक्षाप्रमाणे केवळ निवडणुका जवळ आल्या की पक्ष जागा होत नाही. भाजप सातत्याने लोकांमध्ये काम करत असतो. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच सक्रीय असतात. जिल्हा पंचायत निवडणूक झाल्यानंतर पक्षाने विधानसभेसाठी काम सुरू केले. विधानसभेत बाजी मारल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने बाजी मारली. आत्ता जिल्हा पंचायतीच्या पोट निवडणुका होतील. त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल.
भाजप मतदारांना कधीच ग्राहय़ धरीत नसतो. भाजपचे कार्य सातत्याने सुरू असते. प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा पक्षाचा प्रयत्न असतो व त्यातूनच पक्षाला यश मिळत असते. हल्लीच झालेल्या पंचायत निवडणुकीत सुद्धा प्रत्येक मतदारसंघात पक्षाने ठराविक लोकांवर जबाबदारी दिली होती. त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केल्यानेच भाजपला पंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाची कल्पना नाही
काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या या आपण केवळ प्रसारमाध्यमांतून ऐकल्या. प्रत्यक्षात आपल्याशी कुणीच संपर्क साधलेला नाही. कदाचित दिल्लीतून त्याचे प्रयत्न सुरू असतील. उद्या या आमदारांना पक्षात प्रवेश घेण्याचा आदेश केंद्रातून आला तर तो पाळावा लागेल. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून केंद्रातून येणारे आदेश स्थानिक पातळीवर पाळावे लागतात असे श्री. तानावडे म्हणाले.
सद्याच्या परिस्थितीत राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस कुणालाच होत नाही. त्यामुळे कुणी आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमीच असल्याचे मत श्री. तानावडे यांनी यावेळी व्यक्त केले. सद्या भाजपकडे पुरसे संख्याबळ असून सरकार व्यवस्थितरित्या काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
मडगावच्या चार नगरसेवकांचा प्रवेश हा स्थानिक पातळीवरचा
मडगावचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान मडगाव मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे यांनी केले होते. या संदर्भात बोलताना श्री. तानावडे म्हणाले की, चार नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश हा स्थानिक पातळीवरचा विषय आहे. अद्याप आपल्याकडे कुणी या संदर्भात चर्चा केलेली नाही. जर हा विषय आपल्यापर्यंत आला तर आपण त्यात लक्ष घालीन.
मडगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सातत्याने भाजपचा उमेदवार पराभूत होत असल्याने येथील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. जरी विधानसभा निवडणुकीत पराभव होत असला तरी लोकसभा निवडणुकीत पक्षाला बऱयापैकी मते मिळत आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजप पुन्हा या ठिकाणी चांगली कामगिरी करेल व तेथूनच पुढील विधानसभेची तयारी सुरू होईल व पुढील निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होतील असा दावा ही त्यांनी केला.
भाजप सासष्टी मिशन वगैरे काही राबविणार नाही. पण, सासष्टीत भाजपला बऱयापैकी मते मिळणार यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात सहा महिन्यापूर्वीच भाजपच्या उमेदवार निवडून आणण्याची मोर्चे बांधणी केली होती. त्या प्रमाणे नावेली मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. तशाच पद्धतीने यावेळी दक्षिण व उत्तर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजप जिंकणार असून त्याची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.