कतारवर हल्ल्याच्या संदर्भात इस्रायलचे वक्तव्य
वृत्तसंस्था /तेल अवीव
अमेरिकेत 2001 मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने ज्या प्रकारे अफगाणिस्तावर कारवाई केली, तशाच प्रकारची कारवाई आम्ही कतारवर केली आहे, असे स्पष्टीकरण इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी केले आहे. अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे सूत्रधार अफगाणिस्तानमध्ये होते. त्यामुळे अमेरिकेने त्या देशावर कठोर कारवाई केली. इस्रायलवर हल्ला करणारे हमासचे सूत्रधार कतारमध्ये लपल्याने त्यांच्यावर त्याचप्रकारे आम्हाला कारवाई करावी लागली, अशीही टिप्पणी करत नेतान्याहू यांनी आपल्या धोरणाचे समर्थन केले. जे देश दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत, त्यांनी एकतर दहशतवाद्यांना आपल्या देशाबाहेर काढावे, किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. हे दोन्हीही न केल्यास इस्रायल स्वस्थ बसणार नाही. इस्रायलवर हल्ला करणारे दहशतवादी जेथे असतील, तेथे हल्ला करुन त्यांना टिपण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
दोन्ही हल्ल्यांमध्ये समानता
11 सप्टेंबर 2001 या दिवशी अमेरिकेवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला आणि 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ला यांच्यात मोठी समानता आहे. अल् कायदा या संघटनेच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेवर हल्ला केला होता. अफगाणिस्तान हे अल् कायदाचे आश्रयस्थान होते. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. त्यांचे आश्रयस्थान कतार हे होते. त्यामुळे इस्रायलला अमेरिकेच्याच पावलावर पाऊल टाकून कतारमधील हमासच्या नेत्यांना लक्ष्य करावे लागले. कतारने आपल्या देशात दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये. तसेच जे तेथे आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करुन त्यांना शिक्षा मिळवून द्यावी, तसे केल्यास प्रश्न उरणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला.
कतारवर वायुहल्ल्यामुळे खळबळ
कतार या देशात हमासचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात हमासच्या सर्व वरीष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेने मांडलेल्या शस्त्रसंधी प्रस्तावावर विचार करण्यासाठी ही बैठक होती. तथापि, मंगळवारी हे नेते मुख्यालयात जमलेले असताना या मुख्यालयावरच इस्रायलने वायुहल्ला चढविला. त्यात हे मुख्यालय नष्ट झाल्याचे वृत्त आहे. कतार हा अमेरिकेचा मित्रदेश आहे. अमेरिकेच्या एका मित्रदेशावर अमेरिकेच्याच दुसऱ्या मित्रदेशाने अशा प्रकारे हल्ला करण्याच्या प्रकाराने जगभरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाही. इस्रायलने हा हल्ला आम्हाला विचारुन केला नव्हता, असे स्पष्टीकरण अमेरिकेने त्वरित दिले. तथापि, इस्रायल अमेरिकेच्या संमतीखेरीज असा हल्ला करु शकणार नाही. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलसाठी कतारची फसवणूक केली आहे, असा आरोप इस्रायलविरोधकांकडून केला जात आहे. इस्रालयने मात्र आपल्या या ठोस कृतीचे ठाम समर्थन केले आहे.
भारताकडूनही निषेध
इस्रायलने कतारमधील हमासच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा निषेध भारतानेही केला आहे. सर्वसाधारणत: दहशतवादविरोधाच्या संदर्भात भारत आणि इस्रायल यांच्यात नेहमीच एकमत असते. कोणत्याही कारणास्तव दहशतवादाचे समर्थन होता कामा नये आणि दहशतवाद्यांना कोणीही आश्रय देता कामा नये, हे भारताचे ठाम धोरण आहे. तरीही कतार हा भारताचाही मित्रदेश असल्याने कतारवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध भारताकडून करण्यात आला होता. कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर अशा प्रकारे अन्य देशाने हल्ला करु नये, असे भारताने आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले होते. जगातील इतर अनेक देशांनीही इस्रायलच्या या हल्ल्यावर तीव्र विरोधाच्या प्रतिक्रिया व्यक्त करुन निषेध नोंदविला आहे.









