हे वाक्य भारतातील कोणत्याही लोकवस्तीत ऐकू येणे तसे कठीणच. कितीही साधने, सुविधा, सोयी उपलब्ध असल्या तरी माणसाचे समाधान होत नाही. त्याला सातत्याने आणखी काही तरी हवे असते. त्यामुळे अनेक मुद्दय़ांचा आणि विवादांचा जन्म होतो. तथापि, मध्यप्रदेशात इंदूरनजीक एक गाव असे आहे, की ज्या गावात कोणताही मुद्दा नाही, चर्चा नाही, नाराजी नाही की असमाधान नाही.

इंदूरपासून साधारणतः तीस किलोमीटर दूर क्षिप्रा नदीच्या काठावर हे भारतातील सर्वात समाधानी गाव वसलेले आहे. बुढीबरलाई असे या गावाचे नाव असून तेथे ग्राम पंचायत आहे. येथील गावकऱयांना कोणतीही समस्या नाही, असे ते स्वतःच सांगतात. आम्ही आनंदी आहोत, आमच्याकडे कसलीही कमतरता नाही, जितके आहे त्यात आम्हाला समाधान आहे, असे गावकरी म्हणतात. त्यामुळे येथे कोणत्याही ज्वलंत मुद्दय़ावर (बेकारी किंवा महागाईसह) कधीही चर्चा होत नाही. भांडणे तर दूरच राहिली. गावातील अधिकांश लोक शेतकरी आहेत. नदी जवळच असल्याने आणि ती बारमारी नदी असल्याने पाण्याची समस्या नाही. गावाला जाण्यासाठी एक किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. तो प्रवासासाठी फारसा अनुकूल नसला तरीही गावकऱयांची तक्रार नाही. यंदाच्या निवडणुकीनंतर रस्त्याचे डांबरीकरण होईल, असा त्यांचा विश्वास आहे. असे हे समाधानी गाव असल्याने येथे राजकीय पक्षांचे नेतेही फिरकत नाहीत. तथापि, या गावात मतदान मात्र मोठय़ा प्रमाणात होते, असे सांगितले जाते. एकंदर या गावाचा हेवा वाटावा अशीच स्थिती नाही काय?









