मुसळधार पावसातही हजारोंच्या उपस्थितीत दौड यशस्वी : सदाशिवनगर, नेहरुनगर, रामनगर, अशोकनगर भागात जल्लोषी स्वागत
प्रतिनिधी/ बेळगाव
‘भीती न आम्हा तुझी मुळीही
गडगडणाऱ्या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला
जबाब देती जिभा’
असे म्हणत मुसळधार पावसातही शिवभक्तांनी शनिवारी दौड यशस्वी करून दाखवली. कितीही संकटे आली तरी घेतलेला वसा सोडणार नाही, हे धारकऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याच जिद्दीने आणि ताकदीने हजारोंच्या संख्येने दुर्गामाता दौड भरपावसातही काढण्यात आली. त्यामुळे देव, देश आणि धर्माविषयीची प्रचिती पुन्हा एकदा आली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशी सदाशिवनगर येथील हरिद्रा गणेश मंदिरापासून दौडला प्रारंभ झाला. जोतिबा पाटील, कल्लाप्पा कार्लेकर, एकनाथ अक्षीमनी यांच्या हस्ते गणपतीची आरती करून ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणामंत्र होऊन दौडला सुरुवात झाली. शनिवारी पहाटेपासून बेळगाव शहरात मुसळधार पाऊस असतानाही धारकऱ्यांनी त्याच जिद्दीने दौड पूर्ण करून दाखवली.
सदाशिवनगर, नेहरुनगर, रामनगर, अशोकनगर येथे ठिकठिकाणी दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुसळधार पावसातही दौडचे स्वागत करण्यासाठी शिवभक्तांचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी बालचमूंनी सजीव देखाव्यांचे सादरीकरण केले होते. भगव्या पताका, झेंडे, तसेच कमानी उभारून दौडचे स्वागत झाले. शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दौडची सांगता झाली. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व जोतिबा मंदिराचे ट्रस्टी अॅड. अमर यळ्ळूरकर व इतर पुजाऱ्यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
सोमवार दि. 29 रोजीचा दौडचा मार्ग…
सोमवार दि. 29 रोजी छत्रपती शिवाजी उद्यान येथून दौडला प्रारंभ होणार आहे. एसपीएम रोड, कपिलेश्वर उ•ाणपूल, स्टेशन रोड, हेमू कलानी चौक, रामलिंगखिंड गल्लीमार्गे जत्तीमठ येथील दुर्गामाता मंदिरात दौडची सांगता होणार आहे.









