राजहंसगडावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते शिवमूर्तीचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शौर्याने लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना मला आनंद झाला आहे. राजहंसगड किल्ल्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपने नेहमीच प्रयत्न केले आहेत. यापुढेही विकासासाठी 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जाहीर केले.
जिल्हा प्रशासन, सांस्कृतिक विभाग आणि केआरआयडीएल पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येळ्ळूर येथील राजहंसगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. 2008 साली राजहंसगडाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 14 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यावेळी पर्यटन मंत्री म्हणून जनार्दन रेड्डी होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजहंसगड हा एक अप्रतिम किल्ला आहे. छ. शिवाजी महाराज यांचे गतवैभव आणि इतिहास जपणारा हा किल्ला आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वानुसारच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. आगामी काळातही या किल्ल्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मासाठी जो लढा दिला आहे तो कधीच विसरण्यासारखा नाही. मुघल साम्राज्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी माता जिजाऊ यांची त्यांना प्रेरणा मिळाली. धर्माच्या अस्तित्वासाठी शिवाजी महाराजांनी हा लढा दिला आहे. त्यांचा आदर्श साऱ्यांनी घेण्यासारखा असल्याचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित साऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या. यावेळी परिसर शिवमय बनला होता. या कार्यक्रमाला जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, बेळगाव उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राजहंसगड परिसरातील नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









