मानगढ हुतात्मास्मारकाला दिली भेट : अशोक गेहलोत सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री असा उल्लेख
वृत्तसंस्था / जयपूर
भारताचा भूतकाळ अन् वर्तमान आदिवासी समुदायाशिवाय अपूर्ण आहे आणि देश आदिवासी समुदायाच्या बलिदानांचा ऋणी आहे. या समुदायाने संस्कृतीपासून परंपरांपर्यंत भारतीयत्व जपले आहे. मानगढ धाम हे आदिवासींच्या वीरांच्या तप, त्याग, तपस्या तसेच देशभक्तीचे प्रतिबिंब आहे. हा राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या लोकांचा संयुक्त वारसा असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सुमारे 1500 आदिवासींच्या हौतात्म्याच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट देत आदरांजली वाहिली आहे.
मानगढ धाम भव्य करण्याची इच्छा सर्वांची आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनी परस्परांमध्ये चर्चा करून एक विस्तृत योजना आखावी आणि मानगढ धामच्या विकासाची रुपरेषा तयार करावी. चारही राज्ये तसेच केंद्र सरकार मिळून या धामचा विकास घडवून आणणार असल्याचे मोदी म्हणाले.

कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही सोबत काम केले होते. अशोक गेहलोत हे मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात वरिष्ठ होते. या व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींमध्ये अशोक गेहलोत सर्वात वरिष्ठ मुख्यमंत्री असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मानगढ धामचा इतिहास सुवर्णाक्षरांमध्ये लिहिला गेला आहे. मानगढ धामला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे आवाहन आम्ही पंतप्रधानांना केले आहे. आदिवासी समाज स्वातंत्र्यलढय़ात योगदान देण्यात आघाडीवर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरात मिळणारा सन्मान हा महात्मा गांधींमुळे मिळतो असे उद्गार यावेळी अशोक गेहलोत यांनी काढले आहेत.
देशाला स्वातंत्र्य सहजपणे मिळालेले नाही. आदिवासींच्या बलिदानाबद्दल पडलेला विसर दूर करण्यासाठी मोदी सरकारने त्यांना नमद करण्यासाठी मोहीम चालविली असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गोविंद गुरु यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आहे.
राजकीय संदेश देण्याची तयारी
हा कार्यक्रम गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमधील 99 विधानसभा मतदारसंघांवर (आदिवासीबहुल) प्रभाव पाडणारा आहे. मानगढ हे ठिकाण गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेनजीक आहे. या राज्यांमधील आदिवासी समुदायाचे मानगढ धाम हे श्रद्धास्थान आहे. तसेच महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातही आदिवासी समुदायाचे लक्षणीय प्रमाण आहे. गुजरातमध्ये महिन्याभरात विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांमधील विधानसभेचे 200 तर लोकसभेच्या 50 मतदारसंघांमध्ये आदिवासी समुदायाचे प्रमाण अधिक आहे.
मानगढचा इतिहास
मानगढ धाम हे राजस्थानच्या बांसवाडा जिल्हय़ात आहे. येथील पर्वतावर हे धाम निर्माण करण्यात आले आहे. या पर्वताचा एक भाग गुजरातमध्ये तर दुसरा भाग राजस्थानात आहे. या पर्वतीय क्षेत्रात गोविंद गुरु या आदिवासी नेत्याने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात स्वातंत्र्यलढा चालविला होता. गोविंद गुरु यांच्या नेतृत्वात 17 नोव्हेंबर 1913 रोजी दीड लाखाहून अधिक आदिवासींनी मानगढ पर्वतावर सभा घेतली होती. या सभेवर ब्रिटिशांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात सुमारे 1500 आदिवासींचा मृत्यू झाला होता.









