पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे वादग्रस्त विधान
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
आम्ही मुस्लीम हिंदूंपेक्षा धर्म, संस्कृती आणि विचारधारा या सर्व दृष्टींनी भिन्न आहोत, असे वादग्रस्त विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी केले आहे. ज्या द्विराष्ट्रवादाच्या आधारावर भारताची फाळणी झाली त्या द्विराष्ट्रवादाचे समर्थन त्यांनी केले. मुस्लिमांचे हे वेगळेपण त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना केली. हिंदूंचे आणि आम्हा मुस्लिमांचे कोणत्याही संदर्भात साधर्म्य नाही. संस्कृती, महत्वाकांक्षा, विचारधारा आणि सवयी या सर्व मुद्द्यांवर आम्ही त्यांच्यापेक्षा भिन्न आहोत. याच भिन्नत्वाच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. पाकिस्तान कसा जन्माला आला, याची कथा आपल्या सर्वांना माहीत असली पाहिजे. ती आपण कधीही विसरता कामा नये. आपल्या प्रत्येक पिढीला ती माहित असली पाहिजे. याच निराळेपणामुळे द्विराष्ट्रवादाचा पाया घातला गेला. हिंदू आणि आम्ही ही दोन भिन्न राष्ट्रे आहोत. आम्ही एक राष्ट्र नाही, ही खूणगाठ प्रत्येक पाकिस्तान्याने कायमची लक्षात ठेवावयास हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बलोचांचा नायनाट करणार
सध्या बलुचिस्तानमध्ये दहशतवादाचा कहर झाला आहे. तेथील मूठभर दहशतवादी पाकिस्तानच्या सामर्थ्याला आव्हान देत आहेत. आम्ही त्यांना चिरडणार आहोत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलोच रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटना असून त्यांच्या सदस्यांची एकंदर संख्या केवळ 1 हजार 500 च्या आसपास आहे. त्यांना नष्ट करणे आम्हाला सहज शक्य आहे. आमचे शूर सैनिक त्यांना चुटकीसरशी संपवू शकतात. आम्ही पाकिस्तानच्या हितांना कोठेही बाधा येऊ देणार नाही, अशी दर्पोक्ती त्यांनी केली.
जुन्या वादाला खतपाणी
असीम मुनीर यांच्या हा चिथावणीखोर विधानामुळे भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यावेळी झालेल्या भीषण हिंसाचाराच्या आठवणींना हेतुपुरस्सर उजाळा मिळाला आहे. 1947 मध्ये ही फाळणी झाली. त्यावेळी दीड कोटी लोकांना हिंसाचारामुळे स्थलांतर करावे लागले होते. तसेच किमान 20 लाख लोक या हिंसाचारात बळी पडले होते. असंख्य महिलांवर अनन्वित अत्याचार झाले होते. तो भारताच्या इतिहासातील एक काळा कालावधी होता, ज्याच्या मुळाशी हा द्विराष्ट्रवाद होता. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीना हे या द्विराष्ट्रवादाचेही जनक आहेत. त्यांच्या अतिरेकी विचारसरणीमुळेच भारताची फाळणी झाली होती.









