मंत्री हेब्बाळकर यांची आंदोलकांना ग्वाही
बेळगाव : पंचमसाली समाजाला 2ए आरक्षण मिळावे यासाठीचे आंदोलन अंतिम टप्प्यात असून आमचे संपूर्ण कुटुंब या आंदोलनात आहे. समाजासाठीच्या आंदोलनासंबंधी आम्ही आमचे शब्द पाळतो, अशी ग्वाही महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी दिली. कुडलसंगम येथील पंचमसाली समाजाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखालील समाजाच्या नेत्यांनी गुरुवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेतली. गेल्या आठवडाभरापासून समाजाचे आमदार, मंत्र्यांच्या घरासमोर आरक्षणासाठी पत्रचळवळ करण्यात येत आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून गुरुवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेण्यात आली.
श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी लक्ष्मी हेब्बाळकरांना निवेदन दिले. गेल्या तीन वर्षांपासून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. इतर समाजावर अन्याय करून आम्ही आरक्षण मागत नाही. ही गोष्ट स्वामीजेंनी सुरुवातीलाच जाहीर केली आहे. समाजाच्या प्रती आपण बांधील असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, आर. के. पाटील, गुंडू पाटील, शिवानंद तंबाकी, नंदू कार्जोळ, बसवराज पाटील आदींसह समाजाचे अनेक नेते उपस्थित होते.









