सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे बांबोळी येथे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
आम्ही सर्वजण मातीचेच अंश आहोत. या पृथ्वीवर मातीशिवाय अन्य काहीच नाही. मातीतून निर्माण झाली नाही अशी कोणतीही वस्तू पृथ्वीवर नाही. माती हाच आमच्या जीवनाचा स्रोत आहे. त्यामुळे आजच्या प्रदूषणकारी वातारवणात माती जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी केले.
गत मार्च महिन्यात लंडनहून प्रारंभ केलेल्या ’सेव्ह सॉईल’ चळवळींतर्गत आतापर्यंत 100 दिवसात दुचाकीवरून फिरताना विविध देशांमधून सुमारे 30 हजार किमीचा प्रवास करत गोवा भेटीवर आलेले सद्गुरू वासुदेव यांनी मंगळवारी गोमंतकीयांना मार्गदर्शन केले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खचाखच भरलेल्या स्टेडियमवर सद्गुरुंच्या ओघवत्या शैलीतील भाषणाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल आदींची उपस्थिती होती.
माणसाच्या जीवनात मातीचे महत्व
या पृथ्वीवर अशी कोणतीही वस्तू नाही जी मातीपासून निर्माण झालेली नाही. आमचे शरीर सुद्धा मातीचीच अंश आहे. आम्ही जो श्वास घेतो तो झाडांपासून मिळतो आणि आम्ही सोडलेला श्वासही झाडांकडेच जात असतो. ही झाडे मातीतून जन्म घेतात. यातूनच माणसाच्या जीवनात मातीचे महत्व अधोरेखित होते, असे सद्गुरू म्हणाले.
आज माणसाची भूक शमतच नाही
आज माणसामधील स्वार्थ एवढा पराकोटीला गेला आहे की कितीही मिळाले तरी त्याची भूक शमतच नाही. संपूर्ण पृथ्वी ताब्यात आली तरीही तो समाधानी होत नाही व दुसऱया ग्रहाची मालकी मिळविण्याचे प्रयत्न करतो.
बटाटय़ांच्या शेतकऱयाला होतो आंबे पिकविण्याचा मोह
बटाटय़ांचे पिक घेणाऱया शेतकऱयाला आंबा पिकविण्याचा मोह होतो. त्यानुसार तो आंब्याची लागवड करतो. परंतु बटाटा बाहेर काढण्यासाठी जमीन खोदतात त्या सवयीनुसार तो आंबे शोधण्यासाठीही जमीन खोदू लागतो. त्या प्रयत्नात आंब्याचे झाड कोसळते व तो चिरडतो. आजचा माणूसही त्या शेतकऱयासारखाच झालेला आहे. आनंद आणि सूख शोधण्याच्या प्रयत्नात आपणाला काय हवे आणि आपण करतो काय हेच त्याला माहीत नाही. त्यातूनच पृथ्वीचा नाश होत आहे, आणि हा नाश कुणी भूते-खेते, अघोरी शक्ती वगैरे करत नाही तर आम्ही माणसेच हे कृत्य करत आहोत, असे सद्गुरू म्हणाले.
जगात आजही आत्मिक सूख हेच सर्वश्रेष्ठ
अनेकदा ’जगात सर्वसुखी कोण आहे?’, असा प्रश्न अनेकजण विचारतात. मात्र त्याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. कारण माणूस सदैव आनंद आणि सुखाच्या मागे लागलेला असतो.
जगात सर्वसुखी असेल तर तो मृतदेह
या जगात सर्वसुखी कोण असेल तर तो मृतदेह असू शकतो. कारण त्याच्या सर्व भाव-भावना संपलेल्या असतात. जगातील सर्व ऐश्वर्य, वैभव, उपभोगसुद्धा त्याच्या पुढय़ात आणून ठेवले तरी त्याला त्याची किंमत नसते. अशावेळी 100 टक्के सुखी माणूस या पृथ्वीतलावर सापडणे अशक्य आहे. श्रीकृष्णसुद्धा 100 टक्के सुखी नव्हता. मुळात सूख कशात आहे हेच आम्हाला माहीत नाही. जगात आत्मिक सूख हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही, असे सद्गुरूंनी सांगितले.
आईच्या दुधाला आम्ही संसाधन म्हणू शकत नाही, कारण आईचे दूध हे आमच्यासाठी स्रोत असते. तो स्रोतच मारून टाकला तर आम्ही जगूच शकणार नाही. मातीचेही तसेच आहे. ही माती म्हणजेच आमची माता असते, त्यामुळे ती जगली पाहिजे, असे सद्गुरू म्हणाले.
गोव्याची अर्थव्यवस्था मातीवरच ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागतपर भाषणात निसर्गसौदर्याने नटलेल्या गोव्याची अर्थव्यवस्था खाण आणि शेती या मातीशी संबंधित घटकांवरच अवलंबून असल्याचे सांगितले. अशावेळी सध्यस्थितीत मातीचा ढळणारा कस जागतिक स्तरावर अन्य सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा बनू लागला आहे. त्यामुळेच गोवा राज्यही सदगुरूंच्या सेव्ह सॉईल चळवळीत सहभागी होत आहे. मातीसंबंधी जागतिक स्तरावर जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. योगायोगाने सद्गुरूंच्या या चळवळीशीच संबंधित एक गोष्ट गोव्यात घडत आहे ती म्हणजे लवकरच गोव्यात कृषी महाविद्यालय सुरू होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी ‘सेव्ह सॉईल’ साठी गोवा सरकार आणि ईशा फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री आणि सद्गुरू यांनी अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कराराच्या दस्तऐवजांची देवाणघेवाण केली.
कार्यक्रमात प्रारंभी गोव्याची कला आणि संस्कृती दर्शविणारा दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात आला. बाल भवनच्या राज्यभरातील मुलांनी तयार केलेल्या गोमंतकीयांचे मातीशी नाते दर्शविणाऱया व्हिडिओपटाचे प्रकाशन करण्यात आले. मंत्री नीलेश काब्राल यांनी आभार व्यक्त केले.









