वृत्तसंस्था/ युमेग (क्रोएशिया)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या क्रोएशिया खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना इटलीच्या सोनेगोचा पराभव केला. आता वावरिंका आणि पॉपिरीन यांच्यात रविवारी उशिरा येथे अंतिम सामना खेळवला जाईल.
वावरिंकाने उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीच्या सोनेगोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. मध्यंतरी वावरिंकाच्या डाव्या पायाच्या तळव्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तो टेनिसपासून अलिप्त होता. 2019 नंतर वावरिंकाने एटीपी टूरवरील स्पर्धेत अंतिम फेरी पहिल्यांदाच गाठली आहे. हा सामना 90 मिनिटे चालला होता.
या स्पर्धेत ब्लेझ रोला आणि निनो सेरडेरुसिक यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ब्लेझ रोला आणि निनो सेरडेरुसिक यांनी टॉप सिडेड जोडी सिमोनी बोलेली आणि वॅसोरी यांचा 4-6, 7-6(7-2), 15-13 अशा सेट्समध्ये पराभव केला.









