फळधारणा अत्यल्प : शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता
वार्ताहर/येळळूर
बदलत्या हवामानाचा फटका यावर्षी टरबूज व काकडी पिकाला मोठ्या प्रमाणात बसला असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जोमाने वाढलेल्या वेलीना म्हणावी तशी फळधारणा न झाल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. सुरुवातीला जोमाने फोफावलेल्या वेलीना दोन किंवा तीन एवढीच फळे धरल्यामुळे बाजारपेठेत आवकही कमी होत असल्याचे चित्र आहे. लहान फळ तीस रु., मध्यम फळ पन्नास तर मोठ्या फळाला सत्तर रुपयांपर्यंत किंमत मिळत आहे. येळळूर शिवार जसा बासमती तांदूळ व मसुरीसाठी प्रसिद्ध आहे, तसा तो टरबूज व काकडीसाठीही प्रसिद्ध आहे. जमिनीचा पोत आणि सेंद्रिय खतांचा वापर यामुळे इतर परिसरापेक्षा येळळूर परिसरातील टरबूज व काकडीला एक वेगळीच चव आहे. त्यामुळे गिऱ्हाईकही येळळूर गावची काकडी, टरबूज हेरूनच खरेदी करतो असे, चित्र बाजारातही बघायला मिळते. जाणकार ग्राहकही नाव, गाव विचारूनच खरेदी करतो.
हमखास पैसा देणारे पीक अशी टरबूज, काकडी पिकाची ख्याती असून अल्पावधीत येणारे नगदी पीक म्हणूनच शेतकरी या पिकाची लागवड करतो. ही पिके तीन महिन्यांची असून सध्या याची तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हवामान बदलला आणि रोगाला ही पिके लवकर बळी पडतात. त्यामुळे औषध फवारणी आणि खतपाणी वेळेवर देणे गरजेचे असते. पूर्वी शेतकरी शेतात तात्पुरत्या विहिरी काढून ही पिके घेत होता. पण अलीकडे मनुष्यबळाचा पडणारा तुटवडा बघता पाण्याची सोय टँकरने करण्याचे सुरू आहे.
या पिकासाठी खास पश्चिम दिशेकडून मावळतीकडून येणारा वारा अनुकूल असून त्यात गारवा आणि दव भरपूर असते. ते या पिकासाठी पोषक व फळधारणेसाठी चांगले असते. पण यावर्षी आतापर्यंत या वाऱ्याने पाठ फिरवल्यामुळे फळधारणेवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच फळांचा आकारही मोठा नसल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. काही ठिकाणी किरकोळ फळधारणा झाली असून वेल मात्र कोमेजून आली आहे. टरबूज पीक हे नाशीवंत असल्याने त्याचा उठाव लवकर करावा लागतो. त्यामुळे या पिकाची साठवण करता येत नाही. ग्राहकही उन्हाळ्यात काकडी, टरबूज फळाचा आपल्या आहारात सर्रास वापर करीत असल्याने त्यांना मागणीही चांगली आहे. येळळूर परिसरात बासमती व मसूरपाठोपाठ काकडी, टरबूज व कलींगड पिकावर येळळूरची मोहोर उमटवली आहे. मात्र यातून कलींगड पीक शिवारातून हद्दपार झाले आहे. पण ग्राहक मात्र अजुनही कलींगडाची विचारणा करतो.
टरबूजला कोरड्या हवामानाचा फटका
यावर्षी मऊता (मावळतीकडून सुटणारा) वारा नसल्याने कोरड्या हवामानाचा फटका टरबूज पिकाला बसला असून उष्णतेमुळे फळ कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. फळधारणाच कमी झाल्याने उत्पादनात घट झाली असली तरी फळांना चांगला दर मिळतो आहे. काकडीची लागवड मात्र चांगली होत असली तरी प्रमाण कमी आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी चार पैसे शेतकऱ्यांच्या हाती येणार असे चित्र आहे.
– टरबूज उत्पादक शेतकरी मल्लाप्पा कुगजी.









